Stock Market Today – शेअर बाजारात पुन्हा तेजी; चौफेर खरेदीमुळे सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला, निफ्टी 24,100 च्या पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखातातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ यानंतरही बुधवारी हिंदुस्थानच्या शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराता निर्देशांक निफ्टी चौफेर खरेदीमुळे वधारला. सेन्सेक्स 410 अंकांनी वधारून 77,464 च्या पातळीवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी देखील 120 अंकांच्या वाढीसह 24,172 च्या पार गेला. बाजारातील या बंपर ओपनिंगमुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

सेक्टोरल इंडेक्स वर नजर टाकल्यास, आज सकाळच्या व्यवहारात फायनान्शियल सर्व्हिसेस आणि बँकिंग शेअर्सनी बाजारातील या तेजीचे नेतृत्व केले आहे. याशिवाय निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी डिफेन्स, मॅन्युफॅक्चरिंग, कन्झ्युमर ड्युरेबल आणि रियल्टी सेक्टरही मजबुतीसह हिरव्या निशाणावर टिकून आहेत.

फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये सर्वाधिक 1.08 टक्केची तेजी नोंदवली गेली आहे. ऑटो सेक्टर 0.90 टक्के आणि बँकिंग सेक्टर 0.83 टक्के च्या वाढीसह बाजाराला आधार देत आहेत. दरम्यान, तेजीच्या वातावरणात आयटी क्षेत्रात आज मोठी सुस्ती पाहायला मिळत असून, निफ्टी आयटी सुमारे 1.51 टक्क्यांनी घसरला आहे.

आजचे टॉप गेनर्स आणि लूझर्स

सेन्सेक्समधील बजाज फायनान्स, एक्सिस बँक, इंडिगो, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, बजाज फिन्सर्व आणि एसबीआय या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक नफा कमावला गेला. तर दुसरीकडे, आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा यांच्यासह पॉवर ग्रिड, एनटीपीसी आणि टाटा स्टीलचे शेअर्स आज तोट्यात व्यवहार करत आहेत.

आशियाई बाजारातही तेजी

हिंदुस्थानसह आशियाई बाजाराताही तुफान तेजी दिसून आली. जपानचा निक्केई 225 हा 702.50 अंकांच्या मोठ्या उसळीसह 68,446.00 वर पोहोचला. हाँगकाँगचा हँगसेंग 364.27 अंकांनी वाढून 24,705.00 वर व्यवहार करत आहे. चीनचा शांघाय कंपोझिट या ट्रेंडच्या उलट जात 3.23 अंकांच्या किरकोळ घसरणीसह 3,963.90 वर ट्रेड करत आहे.