
डिलिमिटेशन विधेयकासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नावाने एक बातमी एका वृत्तपत्राने आणि काही वृत्तवाहिन्यांनी चालवली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली. वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले. अद्याप डिलिमिटेशनचे नवीन विधेयक आमच्याकडे आलेले नाही, विधेयक आमच्याकडे आल्याशिवाय आम्ही त्यावर काय बोलणार? असं म्हणत त्यांनी वृत्त फेटाळून लावले. तसेच विधेयक आल्यानंतर २४ तासात त्याचा अभ्यास करून आमची भूमिका काय हे सांगू शकेन, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. डिलिमिटेशन संदर्भात संसदेच्या गेल्या अधिवेशनावेळी काय झाले होते यासंदर्भात सविस्तर माहिती दिली, तसेच अजून विधेयक आलेले नाही तेव्हा यावर काही बोलू शकणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डिलिमिटेशन विधेयकाच्या संदर्भात चर्चा होणे आवश्यक आहे. प्रस्ताव आल्यावर इंडिया आघाडीशी चर्चा केली जाईल. आता त्यावर काही बोलता येणार नाही. विधेयकात हे स्पष्ट असले पाहिजे की कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही. प्रत्येक राज्यात ५० टक्के जागा वाढवणार असल्याचे जरी त्यात नमूद केले तरी त्याची अंमलबजावणी कशी होणार? जागांचा फॉर्म्युला काय असेल हे देखील स्पष्ट झाले पाहिजे. पण अजून कोणतेही विधेयक आमच्याकडे आलेले नाही. इंडिया आघाडीत गेल्यावेळी झालेल्या बैठकीत देखील हे ठरले होते की याची अंमलबजावणी कशी होणार, फॉर्म्युला काय असणार हे आम्हाला लिखित स्वरुपात सरकारकडून मिळाले पाहिजे. त्यावर इंडिया आघाडीत चर्चा केली जाईल. पण अजूनही असे काही लिखित स्वरुपात आलेले नाही. डिलिमिटेशन हे कायद्याने, नियमांना धरून झाले पाहिजे, कोणत्याही एका पक्षाच्या मनमर्जीने चालणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
आम्ही इंडिया आघाडीतच!
महायुतीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘आम्ही इंडिया आघाडीत काम करत आहोत. आम्हाला कुणीही प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीतच आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘
आमच्या पक्षाची बदनामी सुरू आहे…
माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या म्हणजे केवळ पक्षाच्या बदनामीसाठी सुरू आहेत असा आरोप त्यांनी केला. ‘आमच्या पक्षाकडे ईडी, सीबीआय नसल्याने आमच्या पक्षाची बदनामी सुरू आहे. आमचा पक्षाचे खच्चिकरण करण्यासाठी, बदनामी करण्यासाठी हे सुरू आहे’, असे त्या संतापून म्हणाल्या.
इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा
वृत्तपत्रात छापून आलेली बातमी आणि माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांच्या संदर्भात आपली भूमिका इंडिया आघाडीतील नेत्यांशी करून पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बंटी दादा सतेज पाटील अशा तिघांशी यासंदर्भात बोलून माहिती दिल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.





























































