
जगातील सर्वात महागड्या डायनासोर जीवाश्माचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. न्यूयॉर्कमधील सोथबीज लिलावगृहात ‘गस’ (Gus) नावाच्या टायरेनोसॉरस रेक्स (टी-रेक्स) या डायनासोरचा सांगाडा तब्बल 5.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे 482 कोटी ) किंमतीला विकला गेला. सात बोलीदारांमध्ये जवळपास 10 मिनिटे रंगलेल्या चुरशीच्या बोलीनंतर हा ऐतिहासिक सौदा झाला.
सोथबीजच्या विज्ञान आणि नैसर्गिक इतिहास विभागाच्या प्रमुख कॅसँड्रा हॅटन यांनी सांगितले की, अमेरिका हा असा देश आहे जिथे जमिनीवर सापडलेले जीवाश्म संबंधित जमीनमालकाची खासगी मालमत्ता मानले जातात. त्यामुळे त्यांना ते विकण्याचा कायदेशीर अधिकार असतो. याआधी जीवाश्म लिलावातील सर्वात मोठा विक्रम ‘एपेक्स’ नावाच्या स्टेगोसॉरस डायनासोरच्या सांगाड्याच्या नावावर होता. 2024 मध्ये हा सांगाडा 44.6 दशलक्ष डॉलर्सना विकला गेला होता. मात्र ‘गस’ने हा विक्रम मोडत जगातील सर्वात महागडा डायनासोर जीवाश्म होण्याचा मान मिळवला.
‘गस’ हा आतापर्यंत लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा डायनासोर जीवाश्म ठरला आहे. या सांगाड्याचा खरेदीदार कोण आहे, याची माहिती मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ‘गस’ हा जगातील सर्वाधिक चांगल्या स्थितीत जतन झालेल्या टी-रेक्स सांगाड्यांपैकी एक मानला जातो. त्यात 183 जीवाश्मीभूत हाडे असून, तो 2021 मध्ये अमेरिकेतील दक्षिण डकोटा येथील एका गुरांच्या शेतावर सापडला होता.
या सांगाड्याच्या कवटीवर मोठी चाव्याची खूण असून, ती दुसऱ्या डायनासोरशी झालेल्या संघर्षाची असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. तसेच बरगड्यांसह काही हाडे तुटल्यानंतर पुन्हा जुळल्याचेही स्पष्ट दिसते. यावरून हा टी-रेक्स अनेक कठीण संघर्षातून वाचल्याचे मानले जाते. असे वृत्त एनडीटीव्ही इंडियाने दिले आहे. ‘गस’ सुमारे 72 ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर वावरत होता. त्याची लांबी 38 फूट (11.6 मीटर) असून, तो आजपर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या टी-रेक्स सांगाड्यांपैकी एक आहे. हा सांगाडा सुमारे 63 टक्के पूर्ण असल्याचे सांगितले जाते.
लिलावापूर्वी त्याची किंमत 20 ते 30 दशलक्ष डॉलर्स इतकी अपेक्षित होती. मात्र बोलीदरम्यान त्याची किंमत झपाट्याने वाढत जाऊन अखेर 50.1 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचली. या विक्रीनंतर जीवाश्मशास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अशा अमूल्य ऐतिहासिक वस्तू संग्रहालयांऐवजी श्रीमंत खासगी व्यक्तींकडे जात असल्याने संशोधनासाठी त्या उपलब्ध राहत नाहीत.






























































