
>>वैश्विक<<
चंद्राविषयीची विविध माहिती घेताना आपण त्याविषयी जेवढी व्यावहारिक किंवा आपल्या अनुभवाला ‘जो’ चंद्र येतो तेवढीच आवश्यक माहिती घेत आहोत. यातल्या बऱ्याच गोष्टी आम्ही खगोल अभ्यासात गणिती पद्धतीने समजावून सांगतो, परंतु लोकप्रिय लेखमालेत त्याविषयीची ढोबळमानाने ओळख करून द्यावी लागते. विषयात रस निर्माण व्हायला तेवढी पुरेशी असते.
चंद्रावर वातावरण का टिकलं नाही, याचा विचार केला तर चंद्राचं गुरुत्वाकर्षण वातावरण ‘जखडण्या’इतकं सक्षम नाही हे जाणून घेतलं, पण ‘सक्षम’ नाही म्हणजे काय तर पृथ्वीवरची एखादी वस्तू (हवासुद्धा) आपल्या या ग्रहावरून कायमची अवकाशात धाडायची असेल तर त्या ‘वस्तू’चा वेग सेकंदाला 11 किलोमीटर इतका असावा लागतो. तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी निगडित आहे. त्यालाच मुक्ती वेग किंवा ‘एस्केप व्हेलॉसिटी’ म्हणतात. अवकाशात यान पाठवतानाही ते याच वेगाने अग्निबाणाद्वारे (रॉकेट) सोडावं लागतं. साहजिकच त्याच्या इंधनाचा खर्च खूप येतो. तो वेगळा विषय झाला.
आपला मुद्दा असा की, चंद्रावरचं (कधीकाळी असलंच तर ते ) वातावरण चंद्राला का टिकवता आलं नाही? कारण त्याचा मुक्ती वेग सेकंदाला अवघा 2.4 किलोमीटर एवढा कमी आहे. एखाद्या ग्रहावरचं (किंवा उपग्रहावरचं) वातावरण किती वेगाने नष्ट होणार हे त्यावरील वायूंच्या रेणूंची सरासरी गती आणि गुरुत्वाकर्षणाने निर्माण केलेला मुक्तीवेग यावर अवलंबून असतं. त्याचं गुणोत्तर .33 असलं तर ते वायू काही आठवड्यांतच ‘उडून’ अवकाशगामी होतील. चंद्राच्या बाबतीत त्यावरचा हायड्रेजन आणि वाफ फारच लवकर चंद्राला सोडून गेले. उरलेला
ऑक्सिजन आणि नायट्रोजन त्यावर बराच काळ होते, पण चंद्रजन्मानंतर सुमारे 2 अब्ज वर्षांत तेही चंद्राला सोडून गेले. परिणाम काय, तर चंद्रावर वातावरण नाही. त्यामुळे माणसाला तिथे जाऊन राहायचं असेल तर आधी अक्षरशः ‘वातावरण निर्मिती’ करावी लागेल!
चंद्राविषयीची आणखी एक कुतूहलाची गोष्ट म्हणजे चंद्राच्या कला किंवा चंद्रकोर! ‘लकाके कोर चंद्राची’ असं पूर्वी एक गाणं होतं. ‘चवती’च्या चंद्रावर आणि ‘पौर्णिमे’वरही गाणी, कविता झाल्या. अगदी ‘अवसेची रात’ही काव्यात आली, पण मग गोलाकार चंद्र वेगवेगळ्या तिथींना थोडं थोडं दर्शन का देतो याचा विचार आपण कधी केला का? तिथे येतं काव्यापलीकडचं विज्ञान आणि तेही सोपं ‘काव्यात्म’ वाटावं असंच आहे.
आज (16 जुलै) आषाढ महिन्याची शुक्ल द्वितीया किंवा बीज शुद्ध प्रतिपदेचा चंद्र सूर्यास्तानंतर उगवतो, पण लगेच 54 मिनिटांत मावळतो. अमावस्येनंतरचा चंद्रोदय आणि चंद्रास्त पश्चिमेला दिसतो. मात्र ही गोष्ट बुध आणि शुक्रासारखी नाही. हे ग्रह आकाशात मध्यमंडळावर (मेरेडियनवर) कधीच येत नाहीत. चंद्राचा पश्चिमोदय-पश्चिमास्त का होतो, तर आवसेचा चंद्र सूर्याबरोबर उगवून सूर्याबरोबरच मावळलेला असतो (म्हणूनच रात्रीच्या आकाशात दिसत नाही.) दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला तो 54 मिनिटांनी मावळतो. त्यावेळी त्याची नाजूक पुसट कोर दिसते. द्वितीयेला ती अधिक सुंदर, मोहक वाटते. कारण सूर्यास्तानंतर ती पश्चिम क्षितिजावर थोडी वर दिसते.
चंद्राच्या कला म्हणजे ‘ग्रहण’ नव्हे तर सूर्य-पृथ्वी – चंद्र यांच्यामध्ये असलेल्या ‘कोना’चा तो परिणाम असतो. या कोनाला इनांतर म्हणतात. अमावस्थेला हे इनांतर शून्य तर पौर्णिमेला 180 अंश असतं. त्यामुळे पौर्णिमेचा चंद्र सूर्यास्तानंतर लगेच पूर्वेला (180 अंशांच्या कोनामुळे सरळ रेषेत) उगवताना दिसतो. अष्टमीला हाच कोन 90 अंशाचा असल्याने चंद्र माथ्यावर आणि ‘अर्धा’ दिसतो.
सूर्याच्या संदर्भात चंद्र रोज 12 अंशातून सरकत असल्याने अष्टमीला चंद्रकला या सूत्राने एक द्वितीयांश असते. अर्थात तो ‘अर्धा’ दिसतो. थोडक्यात, सूर्य-पृथ्वी – चंद्र यांच्या भ्रमण कक्षांच्या कोनांनुसार (खरं तर पृथ्वी – चंद्र यांच्याच) चंद्राच्या जेवढय़ा भागावरचा परावर्तित सूर्यप्रकाश आपल्या दिसतो तीच ‘चंद्रकला’. आपल्याला पूर्णचंद्र प्रत्येक तिथीला दिसत नसला तरी सूर्य त्याचा एक भाग पूर्णपणे प्रकाशित करतच असतो.
यातलं गणित वगळलं तरी चंद्रकला आणि त्यावर आधारित आपला पारंपरिक चांद्रमास अनेक सणांचा आनंद देतोच, परंतु समुद्राची भरती-ओहोटी अमुक तिथीला कशी असेल हे दर्यावर्दी लोकांना समजतं. रोजची पूर्ण भरती 54 मिनिटे उशिरा येणार याची कल्पना मच्छीमारांनाही असते. त्यानुसार ते दर्यावर जातात.
कोणत्याही दिवशीची तिथी माहीत असेल तर पूर्ण भरतीची वेळ कुठली ते काढता येतं. अमावस्या-पौर्णिमेची पूर्ण भरती बारा वाजता होते. प्रतिपदेला ती 12 वाजून 54 मिनिटांनी (दोन्ही वेळा) होणार. या सोप्या सूत्रानुसार खाडी किंवा समुद्राकडे पाहताना त्यावेळी भरती किंवा ओहोटी असेल तर त्यावरून त्या दिवशी तिथी (चांद्र दिनांक) किती तेही समजतं. पूर्वी सर्वसामान्य माणसं ही गणितं जाणून असायची. बदलत्या काळात ती पुस्तकातून शिकावी लागतात. पण अनुभवता मात्र व्यवहारातच येतात!




























































