
उपांत्य फेरीपूर्वी पॅरिसमध्ये उत्सवाचे वातावरण होते. प्रत्येक पब, रेस्टॉरंट, कॅफे आणि खुल्या मैदानांनी जणू मिनी स्टेडियमचे रूप धारण केले होते. प्रचंड एलईडी स्क्रीन, फ्रान्सचे निळे-पांढरे-लाल झेंडे, चेहऱ्यावर तिरंगी रंग आणि ‘अले ले ब्ल्यू’च्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. आयफेल टॉवरच्या परिसरापासून शाँझ-एलिसेपर्यंत हजारो चाहते एकाच स्वप्नासाठी जमले होते, फ्रान्स पुन्हा विश्वविजेतेपदाच्या उंबरठय़ावर पोहोचेल.
सामना सुरू होताच प्रत्येक पासवर टाळ्या, प्रत्येक आक्रमणावर गर्जना आणि एम्बाप्पे चेंडूला स्पर्श करताच जल्लोष उसळत होता. पॅरिस अक्षरशः जागाच होता.
मात्र अंतिम शिट्टी वाजली आणि स्पेनने 2-0 असा विजय निश्चित केला तसा संपूर्ण शहराचा चेहरामोहराच बदलला. काही क्षणांपूर्वी आनंदाने दुमदुमणारे पब शांत झाले. मोठय़ा पडद्यांसमोर बसलेले चाहते काही मिनिटे जागचे हललेच नाहीत. अनेकांनी डोक्यावरचे झेंडे अलगद खाली घेतले, तर काहींच्या डोळ्यांत अश्रू तरळले. रेस्टॉरंटमधील गोंगाट एका क्षणात कुजबुजीत बदलला.
सामन्यानंतर रस्त्यांवर गर्दी होती, पण जल्लोष नव्हता. चेहऱयावरचा रंग तसाच होता, मात्र त्यामागचे हसू हरवले होते. काही चाहत्यांनी संघाचे आभार मानले, तर अनेकांनी एम्बाप्पेचे नाव घेत ‘पुढच्या वेळी पुन्हा…’ अशी आशेची हाक दिली.
पॅरिसमध्ये दिवे तेवत होते, आयफेल टॉवर नेहमीप्रमाणे उजळून निघाला होता, पण रात्री शहराच्या मनात अंधार दाटला होता. विश्वचषकातून बाहेर पडणे हा फक्त पराभव नव्हता, तर कोट्यवधी फ्रेंच चाहत्यांच्या स्वप्नांचा अचानक तुटलेला धागा होता. मंगळवारच्या रात्री पॅरिस झोपला, पण त्याच्या डोळ्यांत विजयाची नव्हे, तर अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचीच रात्र जागी होती.
फ्रान्सची हॅटट्रिक हुकली!
दुसरीकडे फ्रान्ससाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. 2018 मध्ये रशियात विश्वविजेते ठरलेला आणि 2022 मध्ये कतारमध्ये उपविजेता ठरलेला फ्रान्स यावेळी अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत फायनल गाठण्याची फ्रान्सची हॅटट्रिक मात्र हुकली. या स्पर्धेनंतर तब्बल 14 वर्षांच्या कारकिर्दीनंतर प्रशिक्षक दिदिएर प्रशिक्षकपद सोडणार असल्याने आता त्यांच्या संघासमोर केवळ तिसऱया स्थानासाठीचा सामना उरला आहे.

































































