आयसीसीचा वर्ल्ड कपमध्ये नवा डाव; वन डेत सुपर – 7, तर टी-20 मध्ये सुपर-10 फॉरमॅट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुरुषांच्या वन डे आणि टी-20 वर्ल्ड कप स्पर्धांच्या स्वरूपात मोठे बदल मंजूर केले आहेत. 2027 च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये 14 संघ कायम ठेवत ‘सुपर 7’ हा नवा टप्पा आणण्यात आला आहे, तर टी-20 वर्ल्ड कपमध्ये ‘सुपर-8’ ऐवजी ‘सुपर-10’ फेरी खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 2028 टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्रता प्रक्रियेतही मोठे बदल करण्यात आले आहेत.

एडिनबर्ग येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर  (एजीएम) बुधवारी या नव्या स्पर्धा रचनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. 2027 च्या वन डे विश्वचषकात 14 संघ सहभागी होतील, मात्र स्पर्धेचे स्वरूप आता तीन टप्प्यांत विभागण्यात आले आहे.

पहिला टप्पा असा असेल

पहिल्या टप्प्यात ‘सुपर सीरिज’ खेळविली जाईल. यात क्रमवारीतील 12 व्या, 13 व्या आणि 14 व्या स्थानावरील संघ राऊंड-रॉबिन पद्धतीने एकमेकांविरुद्ध खेळतील. या तीन संघांमधून अव्वल संघ दुसऱया टप्प्यात प्रवेश करेल.

दुसऱया टप्प्यात 12 संघ असतील

दुसऱया टप्प्यात प्रत्येकी सहा संघांचे दोन गट असतील. या फेरीत एकूण 30 सामने होतील. दोन्ही गटांतील अव्वल तीन संघ आणि दोन्ही गटांमधील पुढील सर्वोत्तम (सातवा) संघ असे एकूण सात संघ ‘सुपर-7’ फेरीत पोहोचतील.

सुपर-7’ फेरी अशी असेल

‘सुपर-7’मध्ये सातही संघ एकमेकांविरुद्ध राऊंड-रॉबिन पद्धतीने एकूण 21 सामने खेळतील. त्यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीत धडक देतील. पहिल्या क्रमांकाचा संघ चौथ्या, तर दुसऱया क्रमांकाचा संघ तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी लढेल. विजेते संघ अंतिम फेरी गाठतील.

जुन्या सुपर सिक्सला निरोप

यापूर्वीच्या स्वरूपात सात-सात संघांचे दोन गट होते आणि त्यातून अव्वल तीन संघ ‘सुपर सिक्स’ फेरीत प्रवेश करत होते. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम सामना होत असे. आता या पद्धतीऐवजी अधिक चुरशीची ‘सुपर-7’ फेरी आणण्यात आली आहे.

सुपर-8’ इतिहासजमा

आतापर्यंत टी-20 विश्वचषकात पाच-पाच संघांचे चार गट आणि त्यानंतर ‘सुपर-8’ फेरी खेळविली जात होती. त्या फेरीतून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचत असत. आता ही पद्धत बदलून अधिक स्पर्धात्मक ‘सुपर-10’ रचना स्वीकारण्यात आली आहे.

2028 च्या टी-20 विश्वचषकासाठी

नवी पात्रता प्रक्रिया नेमकी कशी असेल?

आयसीसीने 2028 च्या पुरुष टी-20 विश्वचषकासाठी नवीन पात्रता प्रणालीही जाहीर केली आहे. स्कॉटलंडला युरोप प्रादेशिक अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळेल. 2026 चा टी-20 विश्वचषक खेळलेल्या पण थेट पात्रता न मिळालेल्या संघांना ग्लोबल क्वालिफायरमध्ये खेळावे लागेल. उर्वरित आठ संघ प्रादेशिक पात्रता स्पर्धांतून येतील. त्यानंतर प्रत्येक विभागातील अव्वल संघ आणि एकूण क्रमवारीतील पुढील सर्वोत्तम तीन संघ 2028 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरतील. या बदलांमुळे दोन्ही विश्वचषक स्पर्धांतील प्रत्येक सामन्याचे महत्त्व वाढणार असून सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. आयसीसीने स्पर्धांना अधिक रोमांचक, स्पर्धात्मक आणि प्रेक्षकांसाठी आकर्षक बनविण्याच्या उद्देशाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

टी-20 विश्वचषकात सुपर-10’ची एण्ट्री

टी-20 विश्वचषकाचे स्वरूपही बदलण्यात आले आहे. गट फेरीत प्रत्येकी चार संघांचे पाच गट असतील आणि एकूण 30 सामने खेळविले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढील फेरीत पोहोचतील. अशा प्रकारे 10 संघ ‘सुपर-10’ टप्प्यात खेळतील. ‘सुपर-10’मध्ये पाच-पाच संघांचे दोन गट असतील. या फेरीत एकूण 20 सामने होतील. दोन्ही गटांतील अव्वल संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचतील. उर्वरित दोन जागांसाठी एलिमिनेटर सामने खेळविले जातील. एका गटातील दुसऱया क्रमांकाच्या संघाचा सामना दुसऱया गटातील तिसऱया क्रमांकाच्या संघाशी होईल. दोन्ही एलिमिनेटरचे विजेते उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर अंतिम सामना होईल.