
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोमी अली हिने सलमानवर अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. आपण मरेपर्यंत सलमान खान आपला पाठलाग करणे थांबवणार नाही, असा दावा सोमी अलीने केला आहे.
सलमान तिला मानसिक त्रास देण्याची एकही संधी सोडत नसल्याचे तिने म्हटले असून, तिने आयुष्यात पुढे जावे असे सलमानला अजिबात वाटत नसल्याची चिंता तिने व्यक्त केली आहे. यासोबतच तिने सलमान खानचा उल्लेख अत्यंत ‘कंजूष’ व्यक्ती असा केला आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना सोमीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर तो दुबईला गेला होता. तिथे गेल्यावर सलमानने सोमीच्या सावत्र बहिणीची आणि तिच्या मुलाची भेट घेतली. सलमानला कोणत्याही परिस्थितीत आपल्याशी संपर्कात राहायचे आहे आणि तो आपल्याला शांततेने जगू देत नाही, अशी खंत सोमीने व्यक्त केली आहे. तो आयुष्यभर आपला पिच्छा सोडणार नाही, असा पुनरुच्चार करत तिने सलमानवर छळाचे आरोप केले आहेत.
सोमी अलीने सांगितले की, तिने सलमानला मेसेज करून अजूनही वेळ गेलेली नाही आणि त्याने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन आपल्या चुकीबद्दल माफी मागावी, जेणेकरून सर्व काही ठीक होईल, असा सल्ला दिला होता. मात्र, सलमानने तिचे ऐकले नाही. सोमीने केवळ सलमानलाच नव्हे, तर बिश्नोई समाजालाही हात जोडून विनंती केली होती की, सलमानला मारल्याने त्यांचे काळवीट परत येणार नाही, त्यामुळे त्यांनी त्याला माफ करावे. मात्र बिश्नोई समाजाकडूनही तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हे संपूर्ण प्रकरण 1998 मधील ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे आहे, जेव्हा जोधपूरमध्ये दोने काळवीटांची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर झाला होता. बिश्नोई समाज काळवीटांना पवित्र मानत असल्याने या प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू आहे. 2018 मध्ये जोधपूर न्यायालयाने सलमानला या प्रकरणी दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती, जी सध्या जामिनावर प्रलंबित आहे. या वादामुळे सलमानला गेल्या काही वर्षांत अनेक धमक्याही आल्या आहेत.






























































