
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील वेरूळ आकाजी परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण अपघात होऊन सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. भरधाव आयशर ट्रकने कारला धडक दिल्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या आगीत कारमधील एका कुटुंबातील चार सदस्यांसह ट्रकचा चालक आणि क्लीनर यांचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, वर्धा येथील टिपले कुटुंब आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयात सोडून कारने घरी परतत होते. रविवारी मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास वेरूळ आकाजी परिसरात पाठीमागून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, काही क्षणांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. धडकेमुळे कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल्याने कारमधील चारही जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आगीच्या विळख्यात ट्रकचालक आणि क्लीनरही सापडल्याने त्यांचाही मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली.
या भीषण अपघातानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे वर्धा जिल्ह्यासह राज्यभर हळहळ व्यक्त केली जात असून, समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


































































