शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर थेट मंत्रालयावर धडक देऊ – किसान सभेचा सरकारला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घशाला कोरड पडेपर्यंत ओरडूनही सरकारच्या कानापर्यंत आवाज जात नसल्याने शेतकरीवर्ग संतप्त झाला आहे. राज्यभरातून हजारो शेतकरी पेरणीची कामे सोडून आपल्या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेने पुकारलेल्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर दाखल झाले. सरकारने दडपशाही करत पोलिसांकरवी त्यांना नोटिसा बजावल्या. त्यानंतर शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला असून, आमचे प्रश्न सुटले नाहीत तर थेट मंत्रालयावर धडक देऊ असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी – द्यावी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, पीक विम्याचा निर्णय घ्यावा तसेच गायरान जमिनीच्या कायद्याबाबत सुरू असलेली उलटसुलट प्रक्रिया पेरणीची कामे सोडून हजारो शेतकरी आझाद मैदानावर थांबवावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी व्यासपीठावर येऊन किसान सभेच्या नेत्यांना नोटीस बजावली.

किसान महासभेचे सचिव अजित नवले यांनी त्या नोटिशीवरून सरकारवर शेतकरीविरोधी असल्याची टीका केली. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतला नाही तर शेतकऱ्यांचा संयम सुटेल आणि हा एल्गार मंत्रालयाच्या दिशेने चालू लागेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी आम्ही घेणार नाही, असा इशारा नवले यांनी दिला.