
देशभरातील हजारो विद्यार्थी सध्या रस्त्यावर उतरले असून जंतर-मंतर, इंडिया-गेट आणि देशाच्या विविध भागांत तीव्र आंदोलने छेडत आहेत. नीट-युजी परीक्षेतील गोंधळ आणि जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा निषेध या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विद्यार्थ्यांचा सध्याच्या व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडाला असून, तो पुन्हा संपादन करण्यासाठी सरकारने केवळ सिस्टिमवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे NEET पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर पत्रकारांशी बोलताना प्रियंका गांधी यांनी, केवळ विद्यमान व्यवस्थेच्या चौकटीत राहून या समस्येवर तोडगा निघू शकत नाही, असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचा सध्याच्या व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडाला असून, तो पुन्हा संपादन करण्यासाठी सरकारने केवळ सिस्टिमवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासोबतच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी प्रियंका गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. जर सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत खरोखरच गंभीर असेल, तर आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का करण्यात आला आणि अश्रुधूराचा वापर का झाला, असा थेट सवाल त्यांनी विचारला. सध्या हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून सरकारने त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधावा, असेही त्या म्हणाल्या.































































