
गेल्या काही दिवसांपासून देशात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे आणि ते कशाप्रकारे चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे सर्वांना दिसत आहे. हे संपूर्ण आंदोलन अत्यंत शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. मात्र, केंद्राकडून मुला-मुलींवर दबाव आणला जात आहे आणि त्यांना मारहाण केली जात आहे. याचे पडसाद आता संपूर्ण देशभरासह महाराष्ट्र आणि मुंबईतही उमटू लागले आहेत, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. शिवतीर्थ येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचाही निषेध केला.
वास्तविक पाहता ही अत्यंत साधी गोष्ट होती. या संपूर्ण प्रकरणात आज सत्ताधारी असलेला भाजप जेव्हा विरोधात होता, तेव्हा त्यांनी अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. रझा अकादमीविरुद्ध जेव्हा मोर्चा काढण्यात आला होता, तेव्हा तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त अरुण पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती आणि काँग्रेसच्या काळात त्यांना पदावरून हटवण्यातही आले होते. तसेच 26/11 च्या हल्ल्यावेळी आर. आर. पाटील यांच्या एका वक्तव्यानंतर त्यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. साधारणपणे, जेव्हा तुम्ही एखाद्या पदाची जबाबदारी स्वीकारता, तेव्हा त्या पदावर असताना आलेल्या अपयशाची जबाबदारीही तुम्हीच घेतली पाहिजे; हीच विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
नीटचा पेपर फुटण्याची ही पहिली वेळ नाही, तर ही तिसरी वेळ आहे. जेव्हा केंद्रीय पद्धतीने NEET परीक्षा आणली गेली, त्याचवेळी आम्ही त्याला विरोध केला होता. मात्र, सत्तेच्या मस्तीत कोणाचेही ऐकून घेण्याची त्यांची तयारी नव्हती आणि आजही नाही. सुरुवातीला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली होती. परंतु, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, त्यामुळे हा प्रश्न आता केवळ शिक्षणमंत्र्यांपुरता मर्यादित न राहता थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे. गृहखाते आणि पंतप्रधानांनी यावर जे ट्विट केले आहे, त्याला काहीही अर्थ नाही. जर केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली असती आणि विषय समजून घेतला असता, तर एवढी मोठी वेळ आली नसती. पण सत्तेचा हा उद्दामपणा कशासाठी आहे, हेच समजत नाही, असा टोलाही राज टाकरे यांनी लगावला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ 26 जुलै रोजी मुंबईत मोर्चा; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा pic.twitter.com/hTlzGUASDJ
— Saamana Online (@SaamanaOnline) July 23, 2026
ते पुढे म्हणाले की, यापूर्वी शेतकऱ्यांचे आंदोलन झाले, तेव्हाही सरकार कोणाला भेटायला तयार नव्हते आणि ते आंदोलनही मोडण्याचा प्रयत्न झाला. मणिपूर प्रकरणातही तेच घडले. ग्रामीण भागात आणि आदिवासी भागात अनेक आंदोलने होत आहेत, पण तिकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. ही कसली सत्ता आणि हा कुठला सत्तेचा माज? ही मुले असा काय मोठा हक्क मागत होती? NEET च्या परीक्षेसाठी मुलांना किती कष्ट आणि त्रास सहन करावा लागतो, हे एकदा त्यांना विचारून पाहा. माझा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मी पंतप्रधानांशी नीटच्या परीक्षेबाबत बोललो होतो. मी त्यांना स्पष्ट सांगितले होते की, आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, उद्या विद्यार्थी आत्महत्या करतील; आणि दुर्दैवाने आज तेच घडत आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत आणि त्यांचा सर्व राग, रोष आज रस्त्यावर दिसत आहे. या विद्यार्थ्यांसोबत इतर नागरिकही आंदोलनात उतरले आहेत. हा देशातील एकूण व्यवस्थेविरुद्धचा राग आहे आणि प्रत्येक जण तो व्यक्त करत आहे.
ज्यांची मुले नीटची परीक्षा देत नाहीत, अशा प्रत्येक घरातील आई-वडिलांनाही हे सर्व पाहून त्रास होत आहे. ज्या मुलांनी मोठ्या अपेक्षेने ही परीक्षा दिली, त्यांच्या भविष्याचे काय करायचे आणि त्यांना कशी वाट काढून द्यायची, याचाच आम्ही विचार करत होतो. त्यामुळे आम्ही 26 जुलै रोजी एक मोठा मोर्चा काढणार आहोत. मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात मुले आणि पालक एकत्र येऊन आपला रोष व्यक्त करत आहेत, हे केंद्राला कळणे गरजेचे आहे. हा मोर्चा शिवतीर्थ येथून निघेल आणि सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाईल. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडे घालणार आहोत की, या सरकारला सुबुद्धी मिळो, असेही राज ठाकरे म्हणाले.
तसेच सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या विधानाचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतला. सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी वेळ नाही असे सरन्यायाधीश म्हणाले. मुळात हेच झुरळांचे जन्मदाते आहेत. जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे पाहायला नको? असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. यावेळी त्यांनी पोलिसांच्या एका व्हायरल व्हिडीओवरही टिप्पणी केली. आंदोलन करणारी मुलं गाडीत बसलेली असताना एक पोलीस त्यांना या परत एरियात दिसला तर खिशात 50 ग्रॅमची पावडर टाकेल असे म्हणतोय. म्हणते आता पोलिसांकडे पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस ड्रग्ज सप्लायर आहे का? खरे म्हणजे साधी गोष्ट होती. ज्याची जबाबदारी होती त्याने राजीनामा द्यावा आणि जे सामील असतील त्यांना अटक करावी, परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी आणि चर्चा करावी. तसे झाले असते तर हे सगळे प्रकरण इथपर्यंत आलेच नसते, असेही राज ठाकरे म्हणाले.



























































