
मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी मोडक सागर तलाव गुरुवारी ओव्हरफ्लो झाला. या तलावाचा एक दरवाजा उघडण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांमध्ये तलावांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. गुरुवारी रात्री ओसंडून वाहू लागलेल्या मोडक सागर तलावाची कमाल जलधारण क्षमता ही 12892.5 कोटी लीटर (128,925 दशलक्ष लीटर) आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे 6 वाजताच्या मोजणीनुसार सर्व 7 तलावांमध्ये मिळून 100943.2 कोटी लीटर (10,09,432 दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा तलावांच्या कमाल जलधारण क्षमतेच्या तुलनेत 69.74 टक्के इतका आहे.































































