
नीट पेपर फुटीप्रकरणी तसेच जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ गुरुवारी नांदेड शहर व जिल्ह्याच्या अनेक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी सर्वपक्षीयांच्या वतीने मोर्चे काढून शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.
वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, डावी आघाडी, विद्यार्थी संघटना आदींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंदमध्ये सहभाग नोंदवला. यानंतर आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. यात विविध पक्षांच्या व संघटनांच्या नेत्यांनी सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डाव्या आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने करण्यात आली.






























































