
पालिका रुग्णालयांतील दयनीय अवस्थेचा मुद्दा आज स्थायी समितीत तीव्रपणे मांडण्यात आला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी केईएम, सायन, नायर, व्ही. एन. देसाई, कूपर आणि अग्रवाल रुग्णालयांच्या ढिसाळ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पालिका रुग्णालयांतील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करत कर्मचाऱ्यांच्या मनमानीचा व मक्तेदारीचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर पालिका रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका (नर्स) आणि कर्मचाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले.
शिवसेना नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी ‘शेड्युल’मधील औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. पालिका रुग्णालयांत औषधे आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य या दोन्हींचा तुटवडा आहे. केईएम, सायन आणि नायर यांसारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये अशी परिस्थिती यापूर्वी कधीही उद्भवली नव्हती, असा आरोप श्रद्धा जाधव यांनी केला.
शिवसेना नगरसेविका दीपमाला बढे यांनी मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयातील नादुरुस्त लिफ्ट, पाण्याची गळती, डॉक्टर-नर्स यांची कमतरता आणि शस्त्रक्रिया गृहाची (ऑपरेशन थिएटर) दुरावस्था आदी मुद्दे मांडले. डॉ. सईदा खान आणि गणेश खणकर यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालये आणि पालिका रुग्णालयांमध्ये एकाच ठिकाणी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत; त्यांची दर तीन वर्षांनी बदली अनिवार्य करावी, अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी रुग्णालयांतील बांधकाम गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये छताचे प्लास्टर कोसळल्याने एक रुग्ण दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावला. कूपर रुग्णालयातही एक्स-रे विभागात प्लास्टर पडले होते, याची माहिती आझमी यांनी दिली.
चर्चेअंती डॉक्टर आणि परिचारिकांसह पालिका रुग्णालयांतील सर्व कर्मचाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या केल्या जाव्यात, जेणेकरून वैद्यकीय आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांमधील मक्तेदारीची भावना कमी होईल, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला दिले.




























































