
‘नीट’ पेपरफुटी, दिल्लीतील आंदोलन आणि देशात 22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बडतर्फ करा, अशी मागणी युवासेनेने सिनेट सभेमध्ये केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा पाठिंबा दर्शवून कुलपती राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्वरित बडतर्फ करण्याची विनंती करावी अशा मागणीचे निवेदन युवासेना सिनेट सदस्यांकडून कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांना देण्यात आले.
मुंबई विद्यापीठ तृतीय वर्ष कॉमर्स तीन पेपरफुटीप्रकरणी ‘सीआयडी’ चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही युवासेनेने सिनेटमध्ये केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन पुढील व्यवस्थापन परिषद सभेत मंजुरी घेऊन तपास करण्यात येईल, असे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले.
सिनेट सदस्य परम यादव यांनी पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून दिल्लीसह मुंबईमध्ये विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज व अत्याचाराच्या निषेधाचा ठराव मांडला त्याला प्रदीप सावंत यांनी अनुमोदन दिले. युवासेनेसह ‘बुक्टू’च्या सदस्यांनी पाठिंबा देऊन ठराव संमत झाला. तसेच युवासेनेचे निवेदन स्वीकारून कुलपती राज्यपाल यांना देण्याचे मान्य करण्यात आले.
यावेळी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, मिलिंद साटम, शशिकांत झोरे, धनराज कोहचाडे, परम यादव, अल्पेश भोईर, किसन सावंत, मयूर पांचाळ आणि स्नेहा गवळी उपस्थित होते.



























































