रेल्वे प्रशासनाचे वरातीमागून घोडे, घटना घडल्यावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हालचाली; रेल्वे पोलीस, आरपीएफसोबत सुरक्षेचा आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या काही दिवसांत लोकलमध्ये एकापाठोपाठ एक मारहाणीच्या धक्कादायक घटना घडल्या. यानंतर रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या सुरक्षेची आठवण आली आहे. म्हणूनच सुरक्षेकरिता आणखी काय करता येईल याकरिता रेल्वे प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकल या नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिल्या आहेत. लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाल्यावर दहशतवादी कसाबने सीएसएमटी स्थानकात अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर त्याचा प्रत्यय आलाच. याशिवाय अधेमधे हत्या, महिलांच्या बाबतीतील गुन्हे आदी घटना या घडतच असतात. परिणामी लाखो प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.

बॉम्बस्फोट आणि कसाबने केलेल्या गोळीबारानंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने प्रत्येक रेल्वे स्थानकात डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर (डिएफएमडी) उभे केले. पोलिसांकरवी हॅन्ड मेटल डिटेक्टरद्वारे प्रवाशांच्या सामानांची तपासणी सुरू
झाली. काही महिने हे चालले, पण नंतर हळुहळू डीएफएमडी धूळ खात पडले. आरपीएफकरवी हॅन्ड मेटल डिटेक्टरद्वारे होणारी तपासणीदेखील बंद झाली.

रेल्वे प्रशासनाकडून या साहित्यांचे मेन्टेनन्सच व्यवस्थित होत नसल्याने ही परिस्थिती ओढवली. त्यामुळे कुठला प्रवासी बॅगेतून काय नेतोय हेच समजणे बंद झाले. याचाच गैरफायदा घेत माथेफिरू प्रवासी सोबत चाकू घेऊन प्रवास करू लागले. विरारच्या एका तरुणाची धावत्या लोकलमध्ये भोसकून हत्या केली. गेल्या आठवड्यात तीन ते चार गंभीर स्वरूपाच्या घटना घडल्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाला प्रवाशांची अधिकच चिंता वाटू लागल्याने रेल्वे पोलीस, आरपीएफला सोबत घेऊन सुरक्षेसाठी काय करायचे याची तयारी सुरू केली.

सीसीटीव्ही, एआय बेस कॅमेरे अन्…
रेल्वे हद्दीतील वाढते गुन्हे लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने रेल्वे पोलीस, आरपीएफ यांच्यासोबत नुकतीच बैठक घेऊन नव्याने काय सुरक्षा योजना करता येतील त्यावर चर्चा केली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी एक पत्र देऊन अजून काही स्थानकांवर ७० सीसीटीव्ही बसविणे बाकी असून ते लवकर बसवावेत.

महत्त्वाच्या व गर्दीच्या स्थानकांमध्ये एआय बेस कॅमेरे बसवावे, डीएफएमडी उभे करावे ही विनंती करण्यात आली आहे, पण सुविधा जरी उपलब्ध झाल्या तरी त्यांची डागडुजी करणे, त्याचा व्यवस्थित वापर होणे हे महत्त्वाचे असून नेमका त्याकडे रेल्वे प्रशासनाचा कानाडोळा होतो, असे सांगितले जाते. लोकल व स्थानकांवर मसुब व होमगार्डची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.