
पास्थळ-सालगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पांडे कॉलनी आणि विजय कॉलनीमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या परिसरातील तब्बल १० निवासी इमारती जीर्ण अवस्थेत असून त्या केव्हाही कोसळतील, अशी अवस्था आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तारापूर ड्रेनेज उपविभागाच्या उपअभियंत्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
ग्रामपंचायतीने नुकत्याच केलेल्या पाहणीत पांडे कॉलनी आणि विजय कॉलनीतील अनेक इमारतींची अवस्था अत्यंत धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. इमारतींच्या भिंतींना तडे गेले असून छतांचे काँक्रीट कोसळण्याच्या बेतात आहेत. अनेक ठिकाणी संरचनेची मजबुती कमी झाल्याने या इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याचे ग्रामपंचायतीने एमआयडीसीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे, या धोकादायक इमारतींमध्ये आजही अनेक कुटुंबे वास्तव्यास असल्याने त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
इमारतींची यादीच पाठवली
एमआयडीसीचे यापूर्वीही याकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एमआयडीसी प्रशासनाला पत्र पाठवून संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने आपल्या पत्रासोबत धोकादायक घोषित करण्यात आलेल्या १० इमारतींची यादीही जोडली आहे.



























































