
देश आणि राज्याच्या सत्तेत गळ्यात गळे घातलेल्या शिंदे गट आणि भाजपमध्ये नवी मुंबईत विळ्याभोपळ्याचे वैर निर्माण झाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात पालिका निवडणुकीपासून एकमेकांवर कुरघुडी सुरू आहे. मात्र या दोन सत्ताधाऱ्यांतील वाद आता अधिकाऱ्यांचा बळी घेऊ लागला आहे. या वादाचा विकासकामांवरही विपरीत परिणाम होऊ लागला असून महाविकास आघाडीने मार्गी लावलेला धोकादायक इमारतींचा पुनर्विकास लटकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाशी येथील नैवेद्य या इमारतीला अग्निशमनचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी आपल्यावर सहाय्यक नगररचना संचालक सोमनाथ केकाण यांचा दबाव होता, विकासकामांवरही विपरीत परिणाम असा खुलासा अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी केल्यानंतर शिंदे गट आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. केकाण यांनी या इमारतीला नियम डावलून सीसी आणि ओसी दिल्याचा दोषारोप सभागृहाने लावल्यानंतर त्यांना परत पाठवण्याचा निर्णय महापौर सुजाता पाटील यांनी घेतला. मात्र याच महासभेत पुरुषोत्तम जाधव यांचाही एक कारनामा उघड झाला. जाधव यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी पदी नियुक्ती होण्यासाठी बनवाबनवी केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाचा फटका केकाण यांच्याबरोबर जाधव यांनाही बसणार असल्याचे आता उघड झाले आहे.
सम्राट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
नवी मुंबई महापालिकेतील अनेक अधिकारी हे सम्राट आहेत. त्यापैकी काही अधिकाऱ्यांची ठेकेदारांबरोबर भागीदारी आहे तर काहींनी नातेवाईकांच्या नावाने ठेकेदारी कंपन्या सुरू केल्या आहेत. त्यांच्या या कंपन्यांना अवाचेसवा दराने कामाचा ठेका दिला जात आहे. सेवानिवृत्तीनंतर काही सम्राट अधिकाऱ्यांनी आपल्या कंपन्यांचे पंचतारांकित कार्यालय सुरू केल्यानंतर नवी मुंबईकरांचे डोळे पांढरे झाले. जर शिंदे गट आणि भाजपमधील वाद याच वेगाने पुढे जात राहिला तर अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.



























































