
वेळ सकाळची. सिग्नलवर नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ… लाल दिवा लागला अन् गाडीत बसलेल्या एका रुबाबदार, राजबिंड्या माणसाकडे बघून ‘ए चिकणे… दे ना’ अशी ‘ताली’ वाजली! इकडे टाळी वाजली आणि तिकडे साहेबांचा चेहरा लालेलाल झाला! फर्मान सुटले, आणा पकडून टाळी वाजवणारांना! साहेबांचा हुकूम सर आँखो पर! टाळी वाजवणाऱ्या तीन जणांना पकडून साहेबांसमोर हजर करण्यात आले. पुन्हा सिग्नलवर फिरकणार नाही अशी तंबी देऊन त्यांना सोडण्यात आले. ‘साहब, पैसे से नहीं, थप्पड से डर लगता है’ असे म्हणत ते तिघे वाळूज पोलीस ठाण्यातून बाहेर पडले!
आषाढी एकादशीच्या निमित्ताने छोट्या पंढरपुरातील पोलीस बंदोबस्त तसेच यात्रेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ १ चे पंकज अतुलकर हे सकाळी आपल्या फौजफाट्यासह निघाले. एएस क्लब चौकात सिग्नलवर पोलिसांचा ताफा थांबला. सिग्नल लागताच तीन तृतीयपंथी वाहनधारकांकडून पैसे मागू लागले. पंकज अतुलकर यांच्या गाडीसमोर उभ्या वाहनधारकाला पैसे मागत असतानाच सिग्नल सुटले. परंतु समोर गाडी उभी असल्याने अतुलकर यांना थांबावे लागले. त्यातच एका तृतीयपंथीयाने ‘ए चिकणे.. दे ना’ अशी लडिवाळ मागणी केली.
गाडीत बडा पोलीस अधिकारी आहे हे त्या बिचाऱ्याला माहितीच नव्हते. सिग्नल सुटले, पोलिसांचा ताफा निघून गेला. छोट्या पंढरपुरात बंदोबस्त, यात्रेची तयारी पाहून झाली. परंतु पंकज अतुलकर यांच्या डोक्यात ‘ए चिकणे…’ असा आवाज घुमत होता. बंदी घालूनही हे लोक टाळ्या काय वाजवतात, पैसे काय मागतात… पोलिसांचा काही रुबाब आहे की नाही? अतुलकरांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना त्या तिघांनाही पकडून आणण्याचे फर्मान सोडले. रामेश्वर गाडे हुश्शार! त्यांनी पोलीस आयुक्तांचे खासम् खास असलेले डीबी पथकाचे उपनिरीक्षक सागर पाटील यांना सिग्नलवर पाठवले.
पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील आपला फौजफाटा घेऊन एएस क्लबच्या सिग्नलवर उभे राहिले. टाळीचा आवाज ऐकून पोलिसांनी तिघांना जेरबंद केले. लाली, स्नेहल आणि आराध्या यांना घेऊन पोलिसांची वरात पोलीस ठाण्यात आली. दिवसभर या तिघांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. संध्याकाळी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडण्यात आले.
आम्ही जगायचे कसे, हे तरी पोलिसांनी सांगावे!
‘आम्ही तृतीयपंथी आहोत, निसर्गानेच आम्हाला तसे बनवले आहे. यात आमचा काय दोष आहटी वृतीयपंथी निसगानिच आम्हाला तसे बनवले आहे. यात आमचा काय संघर्षानंतर मतदानाचा अधिकार मिळाला, पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला कधी मिळणार? सरकार नोकरी देत नाही, समाज काम देत नाही, मग आम्ही पोट कसे भरायचे? पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नलवर पैसे मागण्याशिवाय आमच्यासमोर काय पर्याय आहे? असा सवाल तृतीयपंथीयांच्या शिल्पा गुरू यांनी केला.



























































