उपोषण मागे घेण्यापूर्वी सोनम वांगचुक यांनी मान्य करून घेतल्या ‘या’ 3 मागण्या, केंद्र सरकारनं दिलं लिखित आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या 26 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे दिल्लीत उपोषणाला बसले होते. अखेर गुरुवारी रात्री त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. मेदान्ता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले. केंद्र सरकारकडून मागण्यांसंदर्भात लिखित आश्वासन मिळाल्यानंतरच वांगचुक यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. उपोषण सोडल्यानंतर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सरकारने मान्य केलेल्या तीन प्रमुख मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली. या वेळी लडाखच्या ॲपेक्स बॉडीचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. याआधी विविध पक्षाच्या जवळपास 65 खासदारांनी वांगचुक यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा यावर संसदेत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन या खासदारांनी दिले होते. त्यानंतर वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले.

आम्हाला सरकारकडून तोंडी नाही, तर लिखित स्वरूपात आश्वासन हवे होते. त्यामुळेच निर्णय होण्यास दोन दिवस जास्त लागले आणि मला आणखी दोन दिवस उपोषणाला बसावे लागले. गरज पडली असती तर मी आणखी काही दिवस उपोषणाला बसण्यास तयार होतो, असे उपोषण सोडल्यानंतर वांगचुक यांनी स्पष्ट केले.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नाहीतर पंतप्रधानांच्या राजीनाम्याची वेळ येईल! अभिजित दीपके यांचा इशारा 

कोणत्या आहेत 3 मागण्या मान्य करण्यात आल्या?

1. जंतर-मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आणि 20 जुलै रोजी झालेल्या संसदेवरील मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवर किंवा विद्यार्थ्यावर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही.
2. नीट पेपरफुटी रोखण्यासाठी आणि देशातील परीक्षा पद्धतीमध्ये कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी संसदेच्या पटलावर विशेष चर्चा घडवून आणली जाईल.
3. अलीकडेच नीट पेपरफुटी प्रकरणातील तणावामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या पीडित कुटुंबांना योग्य आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मकतेने विचार करेल.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे काय झाले असाही सवाल तुम्ही कराल. हे कधी होईल याबाबत सरकार कोणतेही आश्वासन देऊ शकलेले नाही, मात्र संसदेमध्ये यावर नक्कीच चर्चा होईल. माझ्याकडे दोनच मार्ग होते. मी अनेक आठवडे उपोषणाला बसावे आणि त्यात कदाचित माझा अंत व्हावा. परंतु लढा पुढे नेण्यासाठी तुमचा जीव महत्त्वाचे असल्याचे लोक मला सांगत होते, असेही वांगचुक यांनी स्पष्ट केले. तसेच हा छोटासा मुद्दा सरकार सोडवू शकले नाही, तर त्यांचेच नुकसान होईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, तब्बल 26 दिवसानंतर उपोषण सोडल्यानंतर वांगचुक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 26 दिवसांनंतर आज मला पहिल्यांदाच काहीतरी खायला मिळाले आहे. अन्नाची चव खूप छान वाटत आहे, पण भुकेला स्वतःची अशी कोणतीही चव नसते, असे ते म्हणाले.

मध्यरात्री मोदी प्रकटले…म्हणाले, पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा करणार