तरूणांना भविष्याविषयी प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असे म्हणत शाहिद कपूरने दिला विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरामध्ये विद्यार्थी आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. बाॅलीवुडमधील अनेक सेलिब्रिटींनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. आता यामध्ये शाहिद कपूरनेही या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलनाला पाठिंबा देत शाहिद म्हणाला, तरुणांचा शिक्षणावरील विश्वास उडाला तर काय होईल? असा प्रश्न यावेळी त्याने उपस्थित केला. त्याने लिहिले की, जे विद्यार्थी अनेक वर्षे परीक्षा देण्यात घालवतात, त्यांना आता त्यांच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारण्याचा हक्क आहे.

शाहिद कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली, यातून त्याने हिंदुस्थानातील तरुण आणि देशाची शिक्षण व्यवस्था यांच्यातील वाढत्या दरीवर थेट प्रश्न उपस्थित केले. नीट-यूजी पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टिप्पणी केली आहे, ज्यात आंदोलक शिक्षण व्यवस्थेत सुधारणांची मागणी करत आहेत.

इन्स्टाग्रामवर, शाहिदने शिक्षणावरील तरुणांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्याच्या गरजेवर भाष्य केले आणि ज्या पिढीसाठी ही व्यवस्था अस्तित्वात आहे, त्याच पिढीचा जेव्हा तिच्यावरील विश्वास उडू लागतो, तेव्हा काय होते, असा प्रश्न उपस्थित केला. “ज्या तरुणांसाठी शिक्षण व्यवस्था बनवली आहे, त्याच तरुणांचा जर तिच्यावर विश्वास राहिला नाही तर काय होईल?” असे शाहिदने लिहिले. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.

त्याने पुढे नमूद केले की, जे विद्यार्थी आपल्या भविष्याच्या शोधात परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे समर्पित करतात, त्यांनाही त्यांच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारण्याचा तितकाच हक्क आहे. तरुणांच्या समस्या ऐकल्या गेल्या पाहिजेत यावर जोर देत शाहिद पुढे म्हणाले, “जैसे हर साल वो जवाब लिखते हैं अपने फ्युचर के लिए, आज अपने ही फ्युचर पे उनका यह सवाल है।”