
रस्ता विचारण्याचा बहाणा करून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या तिंघाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीला यश आले आहे. विश्वनाथ शिंदे (वय – 23), प्रथमेश मोरे (वय -20) आणि अक्षय जाधव (वय -23, सर्व रा. वांगी केडगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मे रोजी सायंकाळी पवारवाडी फाटा येथे चिपळूणचा रस्ता विचारण्याचा बहाणा करून आशिष जाधव यांच्या हातातून मोबाईल हिसकावून तिघांनी दुचाकीवरून पळ काढला होता. त्यानंतर तासाभराने शिरगाव रहाटवाडी येथील दत्त मंदिरासमोर रिया शिंदे यांना चिपळूणचा पत्ता विचारून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून त्या तिघांनी पळ काढला. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगली जिल्ह्यातील केडगाव येथून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.पोलिसांनी आरोपीनी चोरलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे,उपनिरीक्षक संदीप ओगले,हवालदार योगेश नार्वेकर,विजय आंबेकर,दीपराज पाटील आणि अतुल कांबळे यांनी केली.


























































