
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून राज्यातील अनेक भागांत भूस्खलन आणि रस्ते बंद होण्याच्या घटना घडत आहेत. राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्राच्या (SEOC) माहितीनुसार, सध्या राज्यातील 76 रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. या परिस्थितीचा परिणाम चारधाम यात्रेवरही झाला असून प्रशासनाने नागरिक आणि यात्रेकरूंना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अहवालानुसार, 1 एप्रिल 2026 पासून नैसर्गिक आपत्तींमध्ये 27 जणांचा मृत्यू , तर 29 जण जखमी झाले आहेत. याशिवाय पावसामुळे 209 घरांचे अंशतः नुकसान, 11 घरांचे गंभीर नुकसान झाले असून तीन घरे पूर्णपणे कोसळली आहेत. अनेक ठिकाणी पशुधनाचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
राज्यातील बंद असलेल्या रस्त्यांमध्ये एका राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे 12 आणि पीएमजीएसवायचे 63 ग्रामीण रस्ते आहेत. पिथोरागढ, डेहराडून, टिहरी, उत्तरकाशी, बागेश्वर आणि चमोली हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर रस्ते सुरू करण्याचे काम सुरू आहे. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.
नैनिताल जिल्ह्यातील ज्योलिकोट परिसरात एक टॅक्सी दरीत कोसळल्याने सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यातील गंगा, अलकनंदा, मंदाकिनी, सरयू, गोमती, शारदा आणि भागीरथी या प्रमुख नद्यांची पाणीपातळी सध्या धोक्याच्या पातळीखाली असली तरी सततच्या पावसामुळे प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा इशारा जारी केला असून सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



























































