जनताच विष्णूचा अवतार! उद्धव ठाकरेंची ‘दणका’ मुलाखत; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय राऊत 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत स्फोटक मुलाखत आज प्रसिद्धीसाठी जात असतानाच जंतर मंतरवरील आंदोलनापुढे मोदी सरकारला झुकावे लागले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे वृत्त थडकले. ‘‘प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल. जनता रस्त्यावर उतरली आहे. तीच विष्णूचा अवतार आहे,’’ असे कडाडणाऱ्या उद्धव ठाकरे यांची भविष्यवाणी खरी ठरली. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला खास मुलाखत दिली.

मुंबईपासून दिल्लीपर्यंत एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ती म्हणजे, जनता आता भीतीच्या पलीकडे गेली आहे. आतापर्यंत सरकारने एक भीतीची बंदूक त्यांच्या मस्तकावर रोखली होती, ती बंदूक आणि ती बंधनं झुगारून, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जनता रस्त्यावर उतरली आहे.

ठिणगीचे रूपांतर क्रांतीत होऊ शकेल. जर वेळेत काही उपाययोजना केली नाही तर या देशात भयानक परिस्थिती उद्भवू शकते आणि एकदा का हा तरुण रस्त्यावर उतरला की, तो त्याचं जे काही म्हणणं आहे ते पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही.

देशामध्ये कालपर्यंत भयाण शांतता होती. इतकी शांतता की, या देशात जिवंतपणा आहे की नाही? असा प्रश्न पडावा. असं एक वातावरण होतं. ज्याला आपण वादळापूर्वीची शांतता म्हणू शकतो, पण अचानक एक वादळ या देशात निर्माण झाले आणि त्या वादळाचा केंद्रबिंदू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घरापासून अर्ध्या किलोमीटरवरचं ‘जंतर मंतर’ होतं. देशातल्या तरुणांच्या विद्रोहाचं ते केंद्र बनलं. संतापाचं केंद्र बनलं आणि या वादळामुळे सारा देश आज निघाला, पेटून निघाला. या वादळापुढे देशातील चाणक्य म्हणवून घेणारे नेते, विष्णूचे अवतार म्हणवून घेणारे नेते हे निष्प्रभ ठरले. त्याच्या बरोबरच दुसरं एक वादळ निर्माण झालं ते म्हणजे अयोध्येतील राममंदिर लुटीचं. त्या राममंदिराच्या लुटीचा विषय हासुद्धा तेवढाच गंभीर आहे. या दोन्ही विषयांत ज्यांनी पहिल्या दिवसापासून सहभाग घेतला, सक्रिय राहिले, या दोन्ही लढ्यांना बळ दिलं ते एकमेव नेते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चार दिवसांपूर्वी दिल्लीत होते. दिल्लीत जाऊन त्यांनी ‘जंतर मंतर’ला आंदोलकांची भेट घेतली, जखमींची भेट घेतली. त्यांच्या वेदना पाहून अत्यंत व्यथित झाले, संतापले. मुंबईत आल्यावर त्यांनी एक सणसणीत मुलाखत ‘सामना’ला दिली. जंतर मंतर ते अयोध्या अशी ही मुलाखत…

उद्धवजी, काल आपण देशाची राजधानी दिल्लीत होतात. प्रत्येक नेता दिल्लीतून भारत आपल्या नजरेने पाहत असतो. तुम्ही नक्की काय पाहिलंत?

– काय राहिलंय पाहण्यासारखं? गेल्या बारा वर्षांपासून देश जे भोगत आलाय, ते पाहता देशाची फसवणूक झाली आहे. दर वेळेला चांगल्या गोष्टींसाठी देश मतदान करत असतो. 2014 पासून आतापर्यंत देशाला नुसती प्रलोभनेच दाखवली गेली आहेत, पण प्रत्यक्ष पदरात काहीच पडले नाही. आपण जे मघाशी म्हणालात की, जो उद्रेक आहे हा उद्रेक केवळ नीट परीक्षा पेपरफुटीचा नाही, तर हा उद्रेक गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये या देशाची जी फसवणूक केली गेली त्याबद्दलचा हा असंतोष आहे. तो अत्यंत प्रखर आहे.

पंतप्रधान हे अवतारी पुरुष आहेत. त्यांना काय फरक पडतो?

– आता खरं म्हणजे जनतेच्या रूपाने विष्णूने अवतार घेतला आहे, असे मी काल जंतर मंतरवर बघितलेय. हा जो विष्णू आहे, देश वाचवण्यासाठी… धर्म वाचवण्यासाठी… धर्म म्हणजे केवळ हिंदू-मुसलमान असं नाहीये… माणुसकीचा धर्म हा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले तरुण आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे आई-वडील आणि आजी-आजोबासुद्धा आहेत. म्हणजे हा विष्णूचाच अवतार आहे. देश वाचवण्यासाठी जन्म घेतला आहे त्यांनी.

आपण दिल्लीतही चिंता व्यक्त केली की, दिल्लीच्या रस्त्यांवर ज्याला आपण ‘जेन झी’ म्हणतो तो तरुण अत्यंत संतप्त झाला आहे…

– काही लोक त्यांना झुरळ म्हणतात, कॉक्रोच म्हणतात… पण संताप उफाळून आलाय त्यांचा.

हा तरुण वर्ग ज्या पद्धतीने दिल्लीच्या रस्त्यांवर संतप्त होऊन फिरत होता, वावरत होता, पोलिसांशी संघर्ष करत होता… ते योग्य आहे का?

– मुंबईपासून दिल्लीपर्यंत एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ती म्हणजे, जनता आता भीतीच्या पलीकडे गेली आहे. आतापर्यंत सरकारने एक भीतीची बंदूक त्यांच्या मस्तकावर रोखली होती, ती बंदूक आणि ती बंधनं झुगारून, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जनता रस्त्यावर उतरली आहे, का उतरणार नाही?

का? तुम्हाला काय वाटलं?

याचं कारण असं की, 2014 पासून एका भोळ्या अपेक्षेने, भाबडेपणाने ज्यांना पाठिबा दिला त्यांनीच पाठीत वार केल्याची भावना जनतेच्या मनात आहे. तुम्ही बघा ना… प्रत्येक ठिकाणी नकारघंटाच आहे. रोजगार मिळताहेत का? नाही… महागाई कमी होते का? नाही… पेट्रोलचे भाव कमी झालेत का? गॅसचे भाव उतरलेत का? नाही… पेट्रोलमध्ये आता इथेनॉलची भेसळ व्हायला लागली आहे, रस्त्यावर खड्डे पडत आहेत, पूल पडताहेत, पक्ष फोडले जात आहेत, दानपेट्या म्हणजेच राम मंदिराची दानपेटी फोडली गेली… लुटली गेली… पेपर फुटताहेत. म्हणजेच या सरकारला कशाचीच काहीही पडलेली नाही.

म्हणजे हे सरकार अपयशी आहे?

– पूर्णपणे… अगदी पूर्णपणे… देशाला बरबाद केलंय.

की सरकार लुटारूच्या भूमिकेत आहे? नक्की तुम्हाला काय म्हणायचंय?

– सरकार म्हणजे शेवटी काय? ती एक यंत्रणा आहे… व्यवस्था आहे… ज्यांना ती व्यवस्था आणि यंत्रणा चालवता येत नाही अशा लोकांच्या हातात हे सरकार आहे. हे देशाचं दुर्दैव आहे आणि त्याच्याविरुद्ध आज जनता पेटलेली आहे.

केवळ दिल्लीत नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात… लोक पेटून उठलेत. खास करून तुम्ही मुंबईत सुरुवात केलीत…

– होय… मी पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या पाठीशी आहे. आता लढणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावंच लागेल.

देशाची तरुण पिढी त्यांच्या भवितव्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. या देशाची शिक्षण पद्धती आणि शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे, हा या आंदोलनाचा मुख्य विचार किंवा केंद्र आहे?

– ही मालिका आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला व्यवस्थित शिक्षण मिळत नाही इथून या तरुणांच्या रागाला सुरुवात झाली. जो शिकला सवरला आहे त्याला नोकरी मिळत नाही ही दुसरी गोष्ट. नोकरी मिळाली तर घर चालवायला पगार पुरत नाही ही तिसरी गोष्ट. त्यानंतर मी ज्याला मत देतोय तो जागेवर राहत नाही… तोच मला फसवतोय… स्वतःचे विकास होताहेत, पण मला साधी रोजीरोटी मिळत नाही आणि त्यावर मीठ चोळलं जातंय ते असं आहे. पंतप्रधान असे म्हणतात की, देशातल्या दीडशे कोटी लोकांपैकी 80 कोटी लोकांना ते फुकट रेशन देत आहेत. तुम्ही काय उपकार करताय का? कोणालाही तुमचे काही फुकट नकोय. कष्ट करण्याची त्यांच्यात धमक आहे. त्या कष्टाला तुम्ही किमान नीट सन्मान द्या. जनतेला भिकारी बनवताय का? अशी मुलं जेव्हा रस्त्यावर उतरतात, त्यांची कॉक्रोच म्हणून हेटाळणी केली जाते. मग तरुणांना कॉक्रोच म्हणणारे लोक काय लायकीचे आहेत?

ही हेटाळणी देशाच्या सरन्यायाधीशांनी केली…

– हो… पण ती अयोग्य आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारक शहीद झाले. त्यांनी प्राण दिले… कोणासाठी दिले? काय वयं होती त्यांची? आता आपण ज्यांना जेन झी म्हणतो, त्या वेळी तो शब्द नसेल, पण त्यांनी त्या वेळेला जर का देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरादाराची, प्राणांची पर्वा न करता आहुती दिली नसती, त्यांनी प्राण दिले नसते, शहीद झाले नसते तर आता ही जी खुर्चीची ऊब तुम्हाला मिळाली आहे ती मिळाली असती का? म्हणजेच आताच्या तरुणांना कॉक्रोच म्हणणं हा त्या क्रांतिकारकांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सतराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला, हे विसरताय का तुम्ही?

सगळे तरुण क्रांतिवीर ‘जेन झी’च होते…

– ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली. अशा सगळ्यांचं कर्तृत्व हे तुमच्यापेक्षा कित्येक पटीने मोठं आहे. तुम्ही फक्त खुर्चीवर बसलात म्हणून आदरणीय असं नाहीये. खुर्चीबद्दल आदर जरूर आहे… खुर्चीचा मान वाढेल अशी वर्तणूक जर कोण करणार नसेल तर त्यांचा आदर कोणी ठेवणार नाही. आतासुद्धा जे काही मी वाचलं, परवा जो दिल्लीत लाठीहल्ला झाला… आपणही दिल्लीत माझ्या सोबत होतात… एक मुलगी विव्हळून सांगत होती, आक्रोश करत होती. तिच्या मनात उद्वेग होता. तिचे कपडे फाडले गेले… मुलींना मारहाण करण्यात आली. काठीला खिळे लावून अनेकांना मारहाण करण्यात आली. या गर्दीत त्यांनी गुंड घुसवले जे सिव्हिल ड्रेसमध्ये होते. त्यांच्या हातात पोलिसांचे दांडके दिले होते. मुलींना कशा पद्धतीने वागवलं… हे क्रौर्य सत्तेच्या माजातून येत आहे.

लाडक्या बहिणी किंवा लाडक्या मुली आहेत त्या सरकारच्या

– म्हणून तुम्ही त्यांना रस्त्यावर असं मारताय का? त्यांच्यावरील निर्घृण अत्याचाराचा व्हिडीओ सादर करत असताना कोर्ट सांगतंय, आम्हाला वेळ नाही! कोण आहात तुम्ही? कोणासाठी बसला आहात तिकडे? हा प्रश्न विचारायचा नाही? म्हणजे तुम्हाला कुत्र्यांसाठी, मांजरांसाठी ‘स्यु मोटो’ घ्यायला वेळ आहे. देशाच्या भविष्यासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे व्हिडीओ बघायला तुम्हाला वेळ नाही? मग न्यायासनावर बसताय कशाला? धृतराष्ट्र झाला आहात की काय तुम्ही?

हे तुम्ही देशाच्या न्याय व्यवस्थेविषयी म्हणताय

– होय… हे म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखे झालेय का आता? मग कशाला चंद्रचुडांनी त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती?

का काढली? तुम्हाला काय वाटतं?

– आता काढून तरी काय उपयोग आहे? जर तुमच्या डोळ्यांदेखत सगळं घडूनही डोळेझाक करणार असाल तर ती न्यायदेवता म्हणेल परत माझ्या डोळ्यावर पट्टी बांधा. हा या देशातल्या जनतेचा अपमान आहे आणि तो कोणीही करता कामा नये. त्यांच्याबद्दल काही बोललं की, लगेच हक्कभंग होतो, अवमान होतो. त्यांची मानहानी होते, पण माझ्या देशाच्या भविष्याशी तुम्ही टिंगल करताय, ही देशाची मानहानी नाही काय?

आपण पाहिले असेल की, देशाच्या सीमेवरच्या अनेक राष्ट्रांमध्ये म्हणजेच नेपाळ असेल, बांगलादेश असेल, पुढे लिबिया असेलतिकडेसुद्धा जेन झी रस्त्यावर उतरली आणि त्यांनी सत्ताबदल केले.

– हीच ताकद आहे त्यांची…

आणि तेव्हा आपल्या देशातील अनेकांची भावना होती की, आपल्याकडे हे कधी होईल? आज ते आपल्याकडे होताना तुम्हाला दिसतंय का?

– असं व्हावं अशी कोणाचीही इच्छा नसते. या टोकापर्यंत या तरुणांना जाण्याची वेळ यावी अशी कोणाचीही इच्छा नसते. साधी गोष्ट होती… अभ्यास करून जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी परीक्षेला जाते, पेपर दिल्यानंतर त्यांना कळतं की, पेपर फुटलाय… या पेपरफुटीमुळे आतापर्यंत जवळपास 20 ते 22 मुलामुलींनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार डोळे-कान बंद करून बसलेय. विद्यार्थ्यांचा आक्रोश दडपला जातो. मग कधी तरी स्फोट होणारच.

त्यांचे पालकही या आंदोलनात होते

– होय… होते ना. काही मुलांनी तर परीक्षेच्या टेन्शनने आत्महत्या केली आहे. तुम्ही त्यांच्या भावनेची, त्यांच्या त्रासाची कदर करणार आहात की नाही आणि एवढं शिकल्यानंतरसुद्धा जर त्यांच्या कपाळी बेकारीचा सोटाच येणार असेल तर मग त्यांचं भविष्य काय? परीक्षा केंद्रात जाऊ इच्छिणारी ही मुले रस्त्यावर का उतरली आहेत? याचा विचार कोण करणार?

तुम्ही जेव्हा रात्री जंतर मंतरला पोहोचलात तेव्हा पाऊस होता. तरीही हजारोंच्या संख्येने तरुण मुले तिकडे होती. तुम्ही भाषण केलेत. तरुणाई समोरून प्रतिसाद देत होती. ‘जंतर मंतरवरचं ते चित्र पाहून तुम्हाला काय वाटलं?

– दोन्ही गोष्टी आहेत. एकतर हृदय पिळवटून टाकणारा तो सगळा विषय आहे. मात्र त्याच बरोबरीने समोर जो काही सगळा तरुण वर्ग होता… देशाचे भाग्यविधाते उभे होते त्यांच्यातील ती हिंमत बघून मलाही वाटलं की, होय… देश जिवंत आहे. हा जिवंतपणा जोपर्यंत देशात आहे तोपर्यंत आपल्या देशात हुकूमशाही येऊ शकत नाही. हा एक आत्मविश्वास मला मिळाला.

धर्मेंद्र प्रधान असे म्हणतात की, हा जिवंतपणा नसून तरुणांचा अतिरेकीपणा आहे आणि गुंडागर्दी आहे. मग आता त्यांना राजीनामा का द्यावा लागला?

– द्यावा लागलाच ना? हा ‘अ’धर्मेंद्र आहे. ‘अ’धर्मेंद्र प्रधान आहे… याच्यात धर्म कुठेय…? शिवसेनाप्रमुखांच्या भाषेत सांगायचं झालं तर यांच्या पार्श्वभागावर रेषा उमटल्या आहेत म्हणून हे खुर्चीत बसलेत. नाहीतर त्या खुर्चीत बसायच्या लायकीचे नाहीत ते…

तुमचं काय म्हणणं आहे.. राजीनामा धर्मेंद्रने द्यावा की नरेंद्रने द्यावा?

– (हसत) सगळे ‘द्र’ आहेत, त्या सगळ्या ‘द्रं’नी द्यावा.  त्यांचा देशाला काहीच उपयोग नाही.

कारण ते जे द्र’, ‘द्र’, ‘द्रआहेत ते जनतेशी द्रोह करताहेत.

– त्यामुळे देशाला दारिद्र्य येऊ नये एवढीच इच्छा आहे, अपेक्षा आहे.

हे सरकार 12 वर्षे राज्य करतंय. 12 वर्षे जनता एका दबावाखाली किंवा अंधभक्तीखाली या देशात जगत राहिली. 12 वर्षांत जे तुम्ही पहिल्यांदा जंतर मंतरवर किंवा देशात जे चित्र पाहिले, जे यापूर्वी कधीच दिसले नव्हते. अचानक भूकंप व्हावा आणि जमिनीतून लाव्हा वर उसळावा

– मी म्हटले ना हा विष्णूचा अवतार आहे…

तुम्हाला काय वाटतंय? लोकांचं भय संपलं? की जनता झोपली होती, लोकशाही झोपली होती

– हे राज्यकर्ते निर्दयी आहेत, पण जनता दयाळू आहे. असे नेहमी म्हणतात की, जनतेची स्मरणशक्ती शॉर्ट असते, पण तसे नाहीये. लोक बघत असतात, पण म्हणतात, ठीक आहे… जाऊ दे… पण किती जाऊ दे? ते जाऊ दे, जाऊ दे करताना सगळंच जायला लागलं, त्या वेळेला जनता मग रस्त्यावर उतरते. जनता झोपलेली नसते, पण झोपल्याचं सोंग घेणारे सत्ताधारी जेव्हा येतात तेव्हा जनतेला आसुड हातात घ्यावा लागतो.

ही क्रांतीची ठिणगी आहे?

– ठिणगीचे रूपांतर क्रांतीत होऊ शकेल. जर वेळेत काही उपाययोजना केली नाही तर या देशात भयानक परिस्थिती उद्भवू शकते आणि एकदा का हा तरुण रस्त्यावर उतरला की, तो त्याचं जे काही म्हणणं आहे ते पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही.

अभिजीत दीपके नावाचा महाराष्ट्रातला एक मराठी तरुण हा अमेरिकेत शिकागोला शिकत होता. सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बेरोजगार तरुणांना जे काही झुरळं, कॉक्रोच म्हटले. त्यानंतर तो तरुण संतप्त होतो, विद्रोह करतो आणि हिंदुस्थानात येऊन एक आंदोलन सुरू करतो. त्याला तरुणांचा प्रचंड पाठिबा मिळतो. जे आतापर्यंत गेल्या 12 वर्षांत कोणत्याही विरोधी पक्षाला करता आले नाही, हे आपल्या सगळ्या विरोधी पक्षांचे अपयश आहे असे तुम्हाला वाटत नाही का?

– आहेच ना… नक्कीच आहे. मी केवळ सत्ताधाऱ्यांना दोष देणार नाही, विरोधी पक्षांनाही देईन. मध्यंतरी मी एकदा कुठेतरी बोललो होतो की, देशाच्या जनतेचा राजकारण्यांवरचा विश्वास आता उडाला आहे. कारण शेवटी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडले जातात. हे धर्मेंद्र प्रधान असतील किंवा अगदी गृहमंत्री अमित शहा यांचेही हे अपयश आहे. पक्ष फोडण्यासाठी ते सत्ताकारण करत आहेत. धर्मेंद्र प्रधानांनी नंतर जी काही पेपर ने-आण करण्यासाठी मिलिटरीची यंत्रणा वापरली ती पेपर फुटण्याच्या आधी का वापरली नाही? तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. निवडून दिल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्याचे काम करा ना…

मग हे मंत्री काय करत होते?

तुम्ही तुमच्या खात्याचा दुरुपयोग पक्ष फोडण्यासाठी करताय. म्हणजे अगदी बंगालमध्येसुद्धा सीआरपीएफचे जवान घुसवून तुम्ही स्वतःच्या पक्षाला विजयी करून घेतलंत. अशा वेळेला सगळ्यांवरचाच विश्वास उडालाय. जे सैन्य आजपर्यंत पाकिस्तानव्याप्त कश्मीरमध्ये यांनी घुसवायला पाहिजे होतं ते तुम्ही बंगालमध्ये घुसवताय? निवडणूक जिंकायला? तिकडे दमदाटी करून निवडणूक जिंकताय… जे सैन्य मणिपूरमध्ये घुसवायला पाहिजे होतं ते तुम्ही बंगालमध्ये घुसवताय. जी शक्ती मणिपूरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी वापरायला हवी होती ती तुम्ही आमच्या तरुणांवर, मुलींवर लाठय़ाकाठय़ा आणि निर्दयीपणे अश्रुधूर सोडण्यासाठी वापरताय? त्यावर प्रश्न विचारायला गेल्यावर देशद्रोही ठरवले जाते. त्यामुळे तुम्ही आता कोणाकोणाला देशद्रोही ठरवणार? तुमच्या घरातली मुलेसुद्धा तिकडे जंतर मंतरवर गेली आहेत.

त्या तरुणांनासुद्धा देशद्रोहीच ठरवले आहे?

– होय…

या आंदोलनात पाकिस्तानचा हात आहे, चीनचा हात आहे असे सांगितले जातेय

– मग आता जे व्हिडीओ आले आहेत की सिव्हिल ड्रेसमध्ये, नागरी वेशात तरुणांना झोडपणारे गुंड दिसताहेत ते गुंड कोणाचे आहेत? भाजपचे आहेत, आरएसएसचे आहेत की पाकिस्तानातून आणले आहेत? आणि मी ‘जंतर मंतर’वर जाहीरपणे बोललोय की, त्यांचे फोटो सोशल मीडियावर करा प्रसारित, की हेच ते वॉण्टेड गुंड आहेत. उद्या सरकार बदललं की, या गुंडांना सोडायचं नाही. त्यांना त्यांची सजा मिळालीच पाहिजे. मोदी म्हणाले होते की, जे अपराधी आहेत त्यांना सोडणार नाही. मग पहिल्या या गुंडांना आत टाका. ज्यांच्या नेमप्लेट नाहीत, मग हे कोण आहेत? त्यांना तुम्ही नाटक कंपनीचे कपडे घालून हातात दंडा देऊन पोलीस बनवले आहेत काय?

सध्या सरकारचे एक धोरण कायम आहे, मग ते नरेंद्र मोदी असोत, अमित शहा असोत की संपूर्ण भारतीय जनता पक्ष असो. विरोधी पक्षाला ते विकत घेतात. आमदार, खासदार फोडतात, सरकारं विकत घेतात, निवडणुका विकत घेतात

– मतं… मतंही विकतच घेतली जातात.

मतं विकत घेतात, जयपराजय विकत घेतात. या देशात विरोधी पक्ष कोणता असावा किंवा नेता कोण असावा हे ते ठरवायला लागले आहेत. अशा वेळेला एवढय़ा ताकदीचे सरकार असताना ते हे आंदोलन का संपवू शकले नाहीत?

– म्हणूनच मी सतत सांगतोय की, हा विष्णूचा अवतार आहे. हा रामाचा अवतार आहे. तुम्हाला त्याचे रौद्र स्वरूप संपवता येणार नाही.

म्हणजे?

– या निर्दयी रावणरूपी सरकारचा किंवा सरकाररूपी रावणाचा वध केल्याशिवाय हा विष्णूचा अवतार आता थांबणार नाही.

या आंदोलनात सातत्याने परकीय हात असल्याचा आरोप केला जातो

– मला असं वाटतंय की, सरकारमध्येच परकीय हात आहे का? की जो आपल्या मुलांवर लाठय़ा चालवतोय, अश्रुधूर सोडतोय… मग आपलं सरकार कोण चालवतोय? हाच आता एक संशोधनाचा विषय आहे. ही सर्व पोरं भारतीय मातेचीच लेकरं आहेत ना?

कोण चालवतंय?

– हाच मोठा संशोधनाचा विषय आहे.

गेल्या काही काळापासून भारतीय जनता पक्षाचा आयटी सेलही एक फार मोठी ताकद होती, पण जंतर मंतरच्या या जेन झीने भाजपचा आयटी सेल उद्ध्वस्त केला.

– वाट लावून ठेवली त्यांची… दाणादाण केली.

ज्या पद्धतीची सक्रियता किंवा ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो ती जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला त्या मुलांच्या बुद्धीचा अभिमान वाटेल.

– तुम्हाला सांगू का… हा लढा अंधभक्त विरुद्ध देशभक्त असा आहे. जंतर मंतरवर देशभक्त आहेत. देशात एक प्रकारे देशभक्तीची लाट उसळली.

लहान मुली घोषणा देत होत्याकाय होत्या त्या? मोदींच्या 56 इंचाच्या छातीची आपण नेहमी टीका केली, पण त्या लहान मुलींची घोषणा होती ‘56 इंच का छोटा बंदरबाल नरेंदरबाल नरेंदर…’ आणि या घोषणा लोकप्रिय झाल्या. सर्वत्र व्हायरल झाल्या. कुणी गाणी म्हणतंयकुणी तिथे पथनाट्य करताहेत, कुणी भाषण करताहेत, कुणी कविता करताहेत

– लोकांना आता मोदी-शहांच्या बंदुकीची भीती राहिलेली नाही. तुरुंगवासाची भीती राहिलेली नाही आणि हे खूप काैतुकास्पद पण आहे व त्याच बरोबर सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने धोकादायक, भीतिदायक आहे.

आपल्या देशातल्या लोकशाहीची प्रकृती सध्या कशी आहे?

– लोकशाहीला या आंदोलनामुळे ऑक्सिजन मिळाला आहे. जी लोकशाही मरणप्राय झाली होती तिला आता ऑक्सिजन मिळालाय. कोणाकडेच दाद मागून जर न्याय मिळणार नसेल आणि द्रौपदीचे वस्त्रहरण होताना धृतराष्ट्र हलणारच नसेल तर मग ती कोणी कविता लिहिली आहे ना… ‘सुनो द्रौपदी शस्त्र उठालो… अब गोविंद ना आएंगे…’

लोकशाही पुन्हा ताठ कण्याने उभी राहण्यासाठी या देशातल्या संपूर्णपणे उद्ध्वस्त केलेल्या संविधानिक संस्था आहेत. त्यात न्यायालये असतील, निवडणूक आयोग असेल किंवा गव्हर्नर्स असतील, लोकसभा, राज्यसभा यांच्या बळावर लोकशाही सुदृढ राहते. या सगळ्या संस्था आज मृतावस्थेत पडल्या आहेत, गुलाम झाल्या आहेत. त्यांचं काय करणार

– काही मृतावस्थेत आहेत, काही दबावाखाली आहेत. हा दबाव जर का एकदा संपला तर मला वाटते की, त्यांना परत नवे काेंब फुटतील. या गोष्टी होतात, कारण हा निसर्गाचा नियम आहे. पानं झडतात… पानं नव्याने येतात. नवीन काेंब येतील, लोकशाही काही मरणार नाही देशातली.

जंतर मंतरचे सगळ्यात मोठे पडसाद महाराष्ट्रात उमटले. शिवसेनेने सर्वात आधी त्यावर भूमिका घेतली.

– होय. नक्कीच. एका कर्तव्य भावनेने आम्ही ते केलं.

तुम्ही किंवा आदित्य ठाकरे यांनीनुसतीच भूमिका घेतली नाही, तर शिवतीर्थावर तरुणांचा विराट असा मेळावा घेतला. तिरंगा यात्रा काढलीत. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पडसाद उमटू लागले. तरुणांच्या आंदोलनाला तत्काळ पाठिंबा दिला पाहिजे, असे तुम्हाला का वाटले?

– शिवसेना ही तरुणांचीच संघटना आहे आणि शिवसेनेचा जन्मच मुळात इथल्या भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी झाला. जर तरुणांसाठी ही संघटना लढणार नसेल, तर तरुणांसाठी दुसरं कोण लढणार आणि त्यांची काय चूक आहे? अभिजीत दीपकेचं तिकडे अमेरिकेत सगळं नीट सुरू होतं. शिकत होता तो… शिकून कदाचित तिथेच नोकरी करून तो राहिलाही असता. त्याला हा ‘नीट’चा विषय उचलण्याची काय गरज होती? विषय उचलला, पण तिथून तो उंटावरून शेळ्या हाकू शकला असता. तो ते सोडून इथे आला. आज तिकडे असंख्य तरुण मुले-मुली घरदार सोडून रस्त्यावर बसल्या आहेत. जवळपास महिना झाला. ते सगळे तिकडेच आहेत. रोज गर्दी वाढते आहे आणि ही मुलं जर का स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवत असतील तर त्यांना आपण बळ देणं हे कर्तव्य मानलं पाहिजे… आणि सगळ्यांनी त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, त्यांना साथ दिलीच पाहिजे.

महाराष्ट्रातले हे आंदोलन तुम्ही स्वतंत्रपणे करताय की, तुमच्या सोबत तुमचे इतरसुद्धा सहकारी पक्ष आहेत?

– आताच मी राजाकडे (राज ठाकरे) होतो. आम्ही म्हणजेच शिवसेना आणि मनसे एकत्र आहोतच. काल माझं दिल्लीत राहुलजींसोबत बोलणं झालं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षसुद्धा म्हणाले, आम्हीही तुमच्या सोबत आहोत. मी इतर राज्यांतील काही नेत्यांशीसुद्धा बोललेलो आहे. तेसुद्धा त्यांच्या त्यांच्या परीने आंदोलन करताहेत. मात्र आता या तरुणांना दिशा दाखवण्याची गरज आहे. आता ते रस्त्यावर उतरले आहेत. फक्त त्यांच्याकडून काही वेडेवाकडे होऊ नये असं जर का वाटत असेल तर सरकारनेसुद्धा वेडंवाकडं पाऊल उचलता कामा नये. कारण शेवटी ते तरुण आजही चर्चेला तयार असतील तर सरकारने त्यांच्या सोबत चर्चा केली पाहिजे. पाकिस्तानसोबत चर्चेचे दरवाजे खुले ठेवा सांगणारी आरएसएस या आंदोलनात गप्प का आहे? का सांगत नाही की, या मुलांसोबत जाऊन चर्चा करा. पाकिस्तानसोबत चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले पाहिजे, आम्ही म्हणजे हिटलर नाही. तुम्ही हिटलर नसाल तर मुलांसोबत तुम्ही हिटलरची भूमिका का करताय? याचे उत्तर आहे त्यांच्याकडे?

सरकार आजही या मस्तीत आहे की, आम्ही हे मुलांचं आंदोलन सहज चिरडून टाकू.

– त्यांनी आजूबाजूला नीट बघायला पाहिजे. ज्या शेख हसीनांना त्यांनी आश्रय दिलाय त्यांना विचारा की, तुम्ही का नाही चिरडू शकलात तुमच्याकडचं आंदोलन…? नेपाळचे पंतप्रधान कुठं पळालेत त्यांना विचारा की, तुम्ही का नाही चिरडू शकलात तुमच्या देशातलं जेन झी आंदोलन? देश म्हणजे दगडधोंडे नाहीत हो… देश म्हणजे देशातील जनता. लोकशाहीमध्ये जनता जशी मत देते, तसे मत व्यक्त करण्याचे प्रकारही त्यांना माहीत आहेत.

जंतर मंतरच्या आंदोलनाचे नेते सोनम वांगचुक यांना सरकारनं जबरदस्तीनं इस्पितळात नेलं. त्यांचं म्हणणं आहे की, हा देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा आहे. हे आपल्याला मान्य आहे का?

– पहिलं स्वातंत्र्य, दुसरं स्वातंत्र्य असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की, हा स्वातंत्र्य टिकवण्याचा लढा आहे. आपण स्वतंत्रच आहोत, पण या स्वातंत्र्यावर कोणी कब्जा करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पाश आवळले जाण्याच्या आधी तोडणं गरजेचं आहे. ते पाश तोडण्याची आणि स्वातंत्र्य टिकवण्याची ही लढाई आहे.

आपण एका प्रमुख राजकीय पक्षाचे प्रमुख आहात. प्रत्येक आंदोलनात राजकीय पक्षाचे नेते, मग ते राहुल गांधी असतील, अखिलेश यादव असतील, राजकारणाचा विचार नक्कीच करतात की, पुढले परिणाम काय होतील? हे आंदोलन सुरू असताना तुमच्या समोर निवडणुकांचा विचार आहे का? कारण निवडणुकांना अजून अडीच वर्षे आहेत. अडीच वर्षे तुम्ही या आंदोलनाची धग टिकवू शकाल?

– पण मग तोपर्यंत मुलं जाताना बघत बसायचं? पेपर फुटलेले बघत बसायचं? मुलांची आयुष्यं उद्ध्वस्त होताना बघत बसायचं? राजकारणात संवेदनशून्य राहून कसं चालेल? आम्ही भाजपपेक्षा वेगळे आहोत.

अडीच वर्षे तुम्ही काय करणार आहात? समजा उद्या सरकारनं हे आंदोलन थंड केलं

– करू दे!

उद्या नरेंद्र मोदी एखाद्या मंदिरात जातील, तपाला बसतील. बाहेर येऊन म्हणतील, मी प्रायश्चित्त घेतलं. पुन्हा अंधभक्त टाळ वाजवायला लागतील

– म्हणूनच मी म्हणतोय की, आपण कशासाठी जगतो आहोत याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. मी जनतेसाठी लढत असेन तर मी निवडणुकीचा विचार न करता मुलांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर आलं पाहिजे किंवा त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. हे आंदोलन थंड व्हावं, चांगल्या पद्धतीनं मिटावं अशी माझी इच्छा आहे. देशात दंगेधोपे व्हावेत, हिंसाचार व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. या मुलांच्या मागणीकडे सरकारनं माणुसकीच्या नजरेनं बघावं. त्यांच्या सोबत जाऊन बसावं, बोलावं आणि आंदोलन संपवावं. पुढच्या वेळी दोन वर्षांनी जे विषय असतील, ते राजकीय विषय राजकारणात घेऊ, पण मुलांचं आयुष्य पणाला लावून तुम्ही राजकारण करणार असाल तर तुम्ही पापी आहात. मला माझ्या राजकारणासाठी मुलांचे जीव नाही घ्यायचे.

शिवसेना 60 वर्षांची झाली. या 60 वर्षांत शिवसेनेनं अनेक आंदोलनं केली. या सगळ्या आंदोलनांचा केंद्रबिंदू हा तरुण वर्गच होता. शिवसेनाप्रमुखांनी पक्षाची स्थापना केली तेव्हाही ते तरुणांचेच नेते होते. वयाच्या 87 व्या वर्षी ते आपल्यातून गेले तेव्हाही ते तरुणांचंच नेतृत्व करत होते. या देशातील तरुणांमध्ये ती परिवर्तनाची शक्ती अजूनही आहे असं आपल्याला वाटतं का

– होय, ती परिवर्तनाची शक्ती दिसते आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, शरीर थकत जातं, वय वाढत जातं, पण ज्या दिवशी तुम्ही मनाने थकाल, मनाने वृद्ध व्हाल, तेव्हा तुम्ही संपलात. तुमचं वय निसर्गाच्या हातात आहे, पण मनाचं तारुण्य टिकवणं हे तुमच्या हातात आहे. तारुण्य म्हणजे काय तर आताच्या मुलांच्या व्यथा, वेदना समजून घेतल्या पाहिजेत. त्या समजून घेत असाल तर तुम्ही त्यांचे नेते होऊ शकाल. नाहीतर तुम्ही तरुण आहात, पण तरुणांना समजून घेत नाही तर तुमच्या वयाचा काय उपयोग आहे?

उद्धवजी, देशातच नव्हे तर जगभरातल्या हिंदूंमध्ये सध्या एक विषय चर्चिला जातोय. त्याविषयीदेखील प्रचंड संताप आहे. अयोध्येत अनेकांच्या त्यागातून, संघर्षातून, बलिदानातून जे राममंदिर उभं राहिलं, त्या मंदिरातील 550 कोटींच्या दानपेट्या चोरीला गेल्या. हा अपहार जवळ जवळ 13 हजार कोटींचा आहे. प्रत्यक्ष रामाची लूट झाली. लोक संताप व्यक्त करतायत. यावर तुमचं काय मत आहे? हे मंदिर मोघलांनी लुटलंय का?

– ‘नीट’चे पेपर आणि मंदिराची दानपेटी ही मोघलांनी लुटलीय, पाकिस्तानने लुटलीय की नेहरूंनी लुटलीय? पेपर नेहरूंनी फोडलेत का? दानपेटी नेहरूंनी फोडली का? ही दोन्ही पापं भाजपची आहेत. आता यांचा मुखवटा गळून पडतोय. ज्या मंदिराच्या नावाने यांनी मतं मिळवली त्या मंदिरातील दानपेटी फोडतायत, ते मंदिर लुटतायत. ज्या तरुणांना भविष्याची स्वप्नं दाखवून मतं मिळवली त्या तरुणाईला चिरडतायत. या दोन्ही गोष्टी भाजपच्या नासलेल्या, सडलेल्या वृत्तीचं प्रतीक आहेत. केवळ राममंदिर लुटलं जात नाहीये. केदारनाथ मंदिर लुटलं गेल्याच्या बातम्या आहेत. बद्रीनाथमध्ये चोरी झाली आहे. उज्जैनमध्ये, अयोध्येत जमीन घोटाळा झालाय. इतर अनेक ठिकाणी घोटाळे झाले असतील, जे अजून लक्षात आलेले नाहीत. म्हणूनच मी म्हणतो की, या देशात युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त बोकाळली आहे.

ही सगळी बुवा शक्ती भाजपच्या हिंदुत्वात सामील झालीय का?

– हो… या बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला किंमत द्या. ती तुम्हाला तारेल. बुवा काही करू शकत नाही. बुवांचं ‘जंतर मंतर’ वेगळं आणि हे ‘जंतर मंतर’ वेगळं. बुवाच्या ‘जंतर मंतर’ने कारभार होऊ शकत नाही. त्यांचं ‘जंतर मंतर’ आता उतरलं आहे लोकांवरून.

हा मंदिर लुटीचा विषय तुम्हाला किती गंभीर वाटतो?

– अतिशय गंभीर आहे. शेवटी हे कोणत्या आधारावर सत्तेत आलेत. रामाच्या नावावरच त्यांचे राजकारण तरारले. आज आम्हाला अनाहूत सल्ले दिले जातायत. मंदिर लुटीचं राजकारण करू नका… तुम्ही कोण सांगणार आम्हाला राजकारण करू नका म्हणून. हिंदुत्वावर सल्ले देतात. कशासाठी? तुम्ही तुमचं काम करा ना. फालतू गोष्टीत नाक खुपसायला वेळ आहे तुम्हाला… त्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू द्या. आमच्या कामात तुम्ही ढवळाढवळ नाही करायची. आम्ही तुमच्या कामात करतो का?

ते तुम्हाला हिंदुत्वावर सल्ले देत आहेत.

– आम्हाला मंदिराच्या राजकारणाचं सांगतात… हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून बाळासाहेबांचा मतदानाचा, निवडणूक लढण्याचा अधिकार काढून घेतला होता. भोगतंय कोण आज? बाबरी पाडल्यानंतर शिवसैनिकांवर केसेस झाल्या होत्या. कोणी भाजपवाला होता का त्याच्यात? तेव्हा तर जबाबदारी टाळली होती यांनी.

ते राम मंदिराचे जनक आहेत.

– जनक? राम मंदिराचा निर्णय हा कोर्टानं दिलाय. मग भूमिपूजन आणि उद्घाटनाला का तिकडं जाऊन बसलात? राष्ट्रपती तिथं का नव्हत्या? म्हणजे जे सगळं चांगलं आहे ते तुमचं आणि जे वाईट आहे ते पाकिस्तानचं. याला काहीच अर्थ नाही. तुम्ही देशाला फसवलंत. धर्माच्या नावानं मतं मागून जनतेला फसवलंत. चांगल्या भविष्याची स्वप्नं दाखवून तुम्ही आम्हाला इतिहासात नाही, तर पुराणात नेलंत. लोकांनी तुम्हाला मतं दिली होती ती उज्ज्वल भविष्यासाठी. ‘अच्छे दिन आयेंगे…’ कुठे आहेत अच्छे दिन?

अच्छे दिन मंदिर लुटणाऱ्यांना आलेत

– आलेच ना. खरंच आहे ते. आता पेट्रोलमध्ये भेसळ करायला लागलात तुम्ही इथेनॉलची. त्यामुळे लोकांनी कष्टानं कमाई करून घेतलेल्या गाडय़ा, स्कूटर बिघडतायत. त्याला जबाबदार कोण? भेसळयुक्त पेट्रोल वापरून लोक ज्या रस्त्यानं जातायत, त्या रस्त्यांवर 200 वर्षे खड्डे पडणार नाहीत असं सांगितलं गेलं. खड्डे तर सोडा, पूलही पडतायत. का लोक चिडणार नाहीत?

तुम्ही आता रामरक्षा आंदोलन सुरू केलंय.

– होय. कारण राम ‘रक्षा’ करणं हे आमचं काम आहे आणि रामरक्षा बोलणं हे आमच्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे. ते काम त्यांच्यावर सोपवलंय आम्ही.

रामाचं संरक्षण तुम्ही करायला निघालेले आहात यावरही टीका होतेय की, रामाचे संरक्षण करणारे तुम्ही कोण? तुम्हाला अधिकार दिला कोणी?

– आम्ही रामभक्त आहोत. राम तुमच्या बापाचा आहे का? राम आमच्या सगळ्यांचा आहे. तुम्ही रामाच्या आडून पापं करताय. आम्ही रामरक्षक आहोत. आमच्या रक्षणासाठी आम्ही ज्या रामाचा धावा करतो, आज त्याच्या रक्षणाची वेळ आमच्यावर आलीय. यालाच तर कलियुग म्हणतात.

आपण रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून केलीत आणि एकदम नागपूर निवडलंत.

– नागपूर देशाचं मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचं काय आहे, आपल्याकडे शब्दखेळ करणारे खूप आहेत. मुख्यमंत्री मला म्हणाले, यांना रामरक्षा पाठ नाहीये, पण म्हणून मी काय यांच्यासारखं टेलिप्रॉम्प्टर लावून रामरक्षा म्हणू? मला माझ्या मनातली जी गोष्ट आहे ती न वाचता बोलता येते. मी रामरक्षा करणाऱ्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून तिकडे गेलो होतो.

आश्चर्यकारकरीत्या राममंदिर लुटीचा विषय काँग्रेसनं, समाजवादी पक्षानं उचलून धरला. इतर अनेक राजकीय पक्षांनी या विषयाला राष्ट्रीय स्तरावर महत्त्व दिलंय. हा तुम्हाला विचारसरणीत होत असलेला बदल दिसतोय का?

– असेलही. माझ्या विचारात काही बदल झालेला नाही. माझं हिंदुत्व माझ्या आजोबांपासून, वडिलांपासून आलेलं आहे. तेच हिंदुत्व घेऊन मी पुढे चाललो आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वात राज्यकारभाराच्या दृष्टीनं एक महत्त्वाची गोष्ट होती. त्यासंदर्भातील व्हिडीओ आता सगळीकडं फिरतायत.

काय सांगायचे बाळासाहेब?

– ते म्हणायचे की, आपलं सरकार असताना मोर्चे आले, तर एका मर्यादेनंतर ते अडवा, पण त्यांच्यावर लाठी नाही उगारायची. ज्या विषयाशी संबंधित तो मोर्चा असेल त्या विषयाचा मंत्री त्यांना जाऊन भेटेल आणि त्यांचं म्हणणं ऐकेल. त्यांना काय पाहिजे ते समजून घेईल. हे आमचं हिंदुत्व आहे. अशी आमची शिवशाही होती.

तिकडे अयोध्येत राम मंदिराच्या दानपेट्या लुटल्या

– निवडणुकीत मतपेट्याही लुटल्या.

दानपेटय़ा, मतपेट्या सगळंच लुटलं. इकडे महाराष्ट्रात आपल्या सहा खासदारांवर दरोडा पडला. याकडं तुम्ही कसं पाहता?

– यांना कारभार करताच येत नाही. सत्ता कशासाठी पाहिजे हेच त्यांना कळत नाही. सत्तांध झाले आहेत. सत्ता मिळवणं, त्यासाठी निवडणूक लढणं हा राजकारणाचा भाग आहे. त्यात काही गैर नाही, पण लोकांनी मतदान केल्यानंतरही तुम्ही फोडाफोडी करताय. पेपर फोडताय. दानपेट्या फोडताय. तुमच्याकडे बहुमत आहे. 12 वर्षे तुम्ही पंतप्रधान आहात. इथं महाराष्ट्रात 12 वर्षांतली मधली माझी अडीच वर्षे सोडली तर गद्दारीच्या जोरावर त्यांचंच सरकार चाललेलं आहे. यांना नेमपं करायचंय काय हेच समजत नाही. चांगलं काही करायचं असेल तर फोडाफोडी का करताय? ठीक आहे. त्यांचा हिशोब नक्कीच करू.

केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार विरोधी पक्षाचं अस्तित्व संपवू पाहतंय. विरोधी पक्षाला काही कामच ठेवायचं नाही

– भाजपचे नड्डा तसं बोललेच होते, आम्ही विरोधी पक्ष ठेवणार नाही म्हणून. तुम्ही किती राहाताय ते बघूच. तुमच्याही पतनाची सुरुवात झाली आहे.

तुम्ही आमदारखासदार निवडून आणायचे आणि भाजपनं किंवा मिंध्यांनी ते पळवायचे किंवा विकत घ्यायचे. असं त्यांनी एक धोरणच ठरवलेलं दिसतंय

– म्हणूनच मी मगाशी म्हटलं की, लोक यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. ते आता बोलू लागलेत. तुम्ही फोडून फोडून काय फोडाल… आम्ही निवडून दिलेले आमदार, नगरसेवक, खासदार… पण आम्ही तुम्हालाच बदलून टाकू, उखडून टाकू देशातून या एका निश्चयानं जनता आता रस्त्यावर उतरलीय आणि हे आता घाबरून बिळात गेले.

विरोधक टीका करतात की, ठाकरेंना त्यांचे खासदार सांभाळता येत नाहीत

– तुम्हाला तरी तुमचा कारभार कुठं सांभाळता येतो? आज गृहमंत्री कुठे आहेत? कुठे दिसतायत? महाराष्ट्रातही नाही आणि देशातही नाही. मुला-मुलींवर अत्याचार होतायत. दिल्लीचं गृह खातं आहे कोणाकडे? नीट पेपरफुटी हे धर्मेंद्र प्रधान यांचं अपयश मानून आपण त्यांचा राजीनामा मागत असू तर आंदोलक मुलींवरती विचित्र पद्धतीने लाठीमार करणाऱ्या गृहमंत्र्यांचाही राजीनामा मागितला पाहिजे. बरं, नीट पेपरफुटीचं केंद्र महाराष्ट्रात आहे, मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा देणार आहेत?

राजकारणाला जो गद्दारीचा रोग जडलेला आहे, फार खोलवर तो कॅन्सर वाढत गेलेला आहे, तो कसा संपेल?

– त्यासाठीच तर विद्यार्थ्यांच्या रूपाने विष्णूचा अवतार रस्त्यावर उतरला आहे. देशाला लागलेले सगळे रोग आता संपतील.

अशा प्रकारच्या राजकारणाची तुम्ही कधी कल्पना केली होती का?

– गेल्या काही दिवसांपासून तशी कल्पना आली होती. जेव्हा शिवसेना हा पक्ष फोडला, पक्ष चोरला तेव्हापासून… शिवसेनेचं नाव आणि निशाणी एका गद्दाराला दिली. खरं तर निशाणी ही गोठवली पाहिजे आणि नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाच्या प्रमुखाला नाही. ते मानायला मी तयार नाही. हे ऑन रेकॉर्ड बोलतोय. कारण शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. ते बदलण्याचा अधिकार देशात कोणालाही नाही आणि मी ते मान्यच करणार नाही. शिवसेना ही शिवसेनाच आहे. दुसरी आहे ती शहासेना आहे. त्याला तुम्ही शहासेना नाव द्या आणि कोणतंही चिन्ह द्या. तोफ द्या, अणुबॉम्ब द्या, राफेलचं विमान द्या. चालेल मला.

या सगळ्याला न्यायालय किती जबाबदार आहे?

– आताचे सरन्यायाधीशच अलीकडं म्हणाले होते की, न्याय नाकारणे म्हणजे न्याय नष्ट करण्यासारखं आहे. आता आमची सहा खासदारांची नवीन केस झाली आहे. त्यावरून काय ते समजून घ्या.

अजून पहिला निकाल लागायचा आहे आणि दुसरी केस चालू झाली आहे

– या सगळ्याचा निकाल आता ही जनता लावेल.

महाराष्ट्राच्या राजकारणात जो पैशांचा खेळ सुरू झाला आहे पन्नासपन्नास कोटींना आमदारखासदार विकले जातात. ही लहान रक्कम नाही. हा इतका पैसा येतो कुठून? मिसिंग लिंकमधून येतो, खड्डय़ांतून येतो की घरी छापतात हे लोकांना कळलं पाहिजे. तुमचं काय मत आहे?

– सरकार बदलल्यानंतर पहिला त्याचाच शोध घ्यावा लागेल. हा पैसा आला कुठून आणि गेला कुठे? हे फार वाईट चाललं आहे. तुम्ही काहीही करा, मी तुम्हाला विकत घेऊ शकतो ही मस्ती फार वाईट आहे.

महाराष्ट्रात भविष्यात बदल घडतील असं वाटतंय आपल्याला?

– मला वाटतं, देशातच बदल होईल. एकतर भाजपनं स्वतःला बदलावं, नाहीतर देश त्यांना बदलेल. ती प्रक्रिया सुरू झालीय.

राज ठाकरे महापालिकेत तुमच्या सोबत होते, नंतर ते फार दिसले नाहीत.

– आम्ही बरोबरच आहोत. रविवारी आम्ही एकत्र आंदोलन करणार आहोत. मोठा तिरंगा मोर्चा आम्ही एकत्र काढतोय. राज सोबतच आहे.

इंडिया ब्लॉक काय म्हणतंय?

– इंडिया ब्लॉक सध्या ब्लॉक झालेला आहे.

ब्लॉक झालेलं असलं तरी तुमच्यासारखे नेते त्या ब्लॉकमध्ये आहेत

– आमचा प्रयत्न सुरू आहे. नक्कीच चांगलं घडेल.

झुरळ जनता पार्टीचं भविष्य काय?

– ही एक आंदोलनाची ठिणगी आहे. तुम्ही लगेच असं समजू नका की, झुरळ जनता पार्टी निवडणूक लढवेल. कॉक्रोच जनता पार्टी सत्तेत येईल. शेवटी ती मुलं आहेत. ती एका उद्वेगानं रस्त्यावर उतरली आहेत. त्यांना कॉक्रोच म्हटल्याचा भयंकर राग आलेला आहे. तो राग आता व्यक्त होतोय. लगेच ते देशात राज्य करतील वगैरे हा पुढचा विषय आहे. ते त्यांना ठरवू द्या, पण आता आपण सर्वांनी त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे. नाहीतर सत्तेला चिकटलेल्या आणि लोकशाहीचं रक्त पिणाऱ्या ज्या गोचिडी बसल्यात, त्या सगळं रक्त शोषून घेतील. मग आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही.

शिवसेनेच्या राजकारणाची पुढची दिशा काय आहे

– आहे त्या दिशेने न थकता, न थांबता वाटचाल करणे.

कार्यक्रम काय आहे?

– तरुणांच्या मागे नेहमीच उभा राहत आलो. जसजसे विषय येतील, तसतसं योग्य-अयोग्य करत त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे.

नुकताच तुम्ही सहा जिल्ह्यांचा दौरा केलात. तो मोठा दौरा होता. तुम्ही नागपूरला जाऊन आलात. दिल्लीत जाऊन आलात. ‘जंतर मंतरच्या हजारो आंदोलकांना भेटलात. ही सक्रियता आणि हे दौरे सुरूच राहतील का?

– मला जिथं जिथं जाणं आवश्यक वाटेल तिथं मी जाणार. लोकांना भेटणार. मग तो दौरा शेतकऱ्यांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, रामरक्षेसाठी असेल. मी जाणार.

रामरक्षा आंदोलन चालूच राहणार का?

– रामरक्षा आंदोलन चालूच राहणार. कारण मला एक भीती आहे. कदाचित या मंदिर चोरी प्रकरणाचा खोटा तपास केला जाईल. काही जणांना उगाचच लटकवलं जाईल. बाकीच्यांना क्लीन चिट देऊन या विषयावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न होईल. पुन्हा त्या पांघरूणाखालनं चोऱ्या चालू राहतील. त्या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे. हा सगळा तपास निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. ते मान्य करतील की नाही माहीत नाही, पण ते निष्पक्षपातीपणे तपास आणि न्यायनिवाडा करू शकतील असं मला वाटतं. अर्थात हा विषय ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांचा आहे.

आपण हिंदुत्वाचे चौकीदार म्हणून काम करू इच्छिता असं मला वाटतं

– नाही. इकडे चौकीदार कोणी नाही. आता ‘चौकीदार’ हा शब्द बदनाम झाला आहे. राम मंदिरात चौकीदार असतानाही चोऱ्या झाल्यात. त्यामुळे मी जसा आहे तसाच ठीक आहे. मी देशभक्त हिंदू आहे, तसाच मला राहू द्या.

लोकांना काय आवाहन कराल?

– बोलण्यासारखं खूप काही आहे. माझं सगळ्यांनुा एक आवाहन आहे. आपण जागे झाला असाल तर तरुणांच्या पाठीशी उभे रहा. कारण हे आपल्या देशाचं भविष्य आहे. आता तुम्ही शांत राहिलात तर उद्या तुम्ही जगू शकणार नाही. म्हणून जिथे कुठे असाल, जे जे काही करता येणं शक्य असेल ते ते या देशासाठी जरूर करा. जिथे आहात तिथून लढा. पक्षाच्या पलीकडे आणि धर्माच्या पलीकडे जाऊन देशासाठी लढा.

जय महाराष्ट्र!

“सरकारने आजूबाजूला नीट बघायला पाहिजे. ज्या शेख हसीनांना त्यांनी आश्रय दिलाय त्यांना विचारा की, तुम्ही का नाही चिरडू शकलात तुमच्याकडचं आंदोलन…? नेपाळचे पंतप्रधान कुठं पळालेत त्यांना विचारा की, तुम्ही का नाही चिरडू शकलात तुमच्या देशातलं जेन झी आंदोलन? देश म्हणजे दगडधोंडे नाहीत हो… देश म्हणजे देशातील जनता. लोकशाहीमध्ये जनता जशी मत देते, तसे मत व्यक्त करण्याचे प्रकारही त्यांना माहीत आहेत.”

2014 पासून एका भोळ्या अपेक्षेने, भाबडेपणाने ज्यांना पाठिंबा दिला त्यांनीच पाठीत वार केल्याची भावना जनतेच्या मनात आहे. तुम्ही बघा नाप्रत्येक ठिकाणी नकारघंटाच आहे. रोजगार मिळताहेत का? नाहीमहागाई कमी होते का? नाहीपेट्रोलचे भाव कमी झालेत का? गॅसचे भाव उतरलेत का? नाहीपेट्रोलमध्ये आता इथेनॉलची भेसळ व्हायला लागली आहे, रस्त्यावर खड्डे पडत आहेत, पूल पडताहेत, पक्ष फोडले जात आहेत, दानपेट्या म्हणजेच राम मंदिराची दानपेटी फोडली गेलीलुटली गेलीपेपर फुटताहेत. म्हणजेच या सरकारला कशाचीच काहीही पडलेली नाही.

जनतेच्या रूपाने विष्णूने अवतार घेतला आहे, असे मी काल जंतर मंतरवर बघितलेय. हा जो विष्णू आहे, देश वाचवण्यासाठीधर्म वाचवण्यासाठीधर्म म्हणजे केवळ हिंदूमुसलमान असं नाहीयेमाणुसकीचा धर्म हा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले तरुण आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे आईवडील आणि आजीआजोबासुद्धा आहेत. म्हणजे हा विष्णूचाच अवतार आहे. देश वाचवण्यासाठी जन्म घेतला आहे त्यांनी.

देशाच्या जनतेचा राजकारण्यांवरचा विश्वास आता उडाला आहे. कारण शेवटी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडले जातात. हे धर्मेंद्र प्रधान असतील किंवा अगदी गृहमंत्री अमित शहा यांचेही अपयश आहे. पक्ष फोडण्यासाठी ते सत्ताकारण करत आहेत. धर्मेंद्र प्रधानांनी नंतर जी काही पेपर नेआण करण्यासाठी मिलिटरीची यंत्रणा वापरली ती पेपर फुटण्याच्या आधी का वापरली नाही? तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. निवडून दिल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्याचे काम करा ना

मी जनतेसाठी लढत असेन तर मी निवडणुकीचा विचार करता मुलांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर आलं पाहिजे किंवा त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. हे आंदोलन थंड व्हावं, चांगल्या पद्धतीनं मिटावं अशी माझी इच्छा आहे. देशात दंगेधोपे व्हावेत, हिंसाचार व्हावा असं मला अजिबात वाटत नाही. या मुलांच्या मागणीकडे सरकारनं माणुसकीच्या नजरेनं बघावं. त्यांच्या सोबत जाऊन बसावं, बोलावं आणि आंदोलन संपवावं. पुढच्या वेळी दोन वर्षांनी जे विषय असतील, ते राजकीय विषय राजकारणात घेऊ, पण मुलांचं आयुष्य पणाला लावून तुम्ही राजकारण करणार असाल तर तुम्ही पापी आहात. मला माझ्या राजकारणासाठी मुलांचे जीव नाही घ्यायचेत.

नागरी वेशात तरुणांना झोडपणारे गुंड दिसताहेत ते गुंड कोणाचे आहेत? भाजपचे आहेत, आरएसएसचे आहेत की पाकिस्तानातून आणले आहेत? आणि मी जंतर मंतरवर जाहीरपणे बोललोय की, त्यांचे फोटो सोशल मीडियावर करा प्रसारित, की हेच ते वॉण्टेड गुंड आहेत. उद्या सरकार बदललं की, या गुंडांना सोडायचं नाही. त्यांना त्यांची सजा मिळालीच पाहिजे.

लोकशाहीला या आंदोलनामुळे ऑक्सिजन मिळाला आहे. जी लोकशाही मरणप्राय झाली होती तिला आता ऑक्सिजन मिळालाय. कोणाकडेच दाद मागून जर न्याय मिळणार नसेल आणि द्रौपदीचे वस्त्रहरण होताना धृतराष्ट्र हलणारच नसेल तर मग ती कोणी कविता लिहिली आहे ना… ‘सुनो द्रौपदी शस्त्र उठालोअब गोविंद ना आएंगे…’

तुम्ही तुमच्या खात्याचा दुरुपयोग पक्ष फोडण्यासाठी करताय. म्हणजे अगदी बंगालमध्येसुद्धा सीआरपीएफचे जवान घुसवून तुम्ही स्वतःच्या पक्षाला विजयी करून घेतलंत. अशा वेळेला सगळ्यांवरचाच विश्वास उडालाय. जे सैन्य आजपर्यंत पाकिस्तानव्याप्त कश्मीरमध्ये यांनी घुसवायला पाहिजे होतं ते तुम्ही बंगालमध्ये घुसवताय? निवडणूक जिंकायला? तिकडे दमदाटी करून निवडणूक जिंकतायजे सैन्य मणिपूरमध्ये घुसवायला पाहिजे होतं ते तुम्ही बंगालमध्ये घुसवताय. जी शक्ती मणिपूरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी वापरायला हवी होती ती तुम्ही आमच्या तरुणांवर, मुलींवर लाठ्याकाठ्या आणि निर्दयीपणे अश्रुधूर सोडण्यासाठी वापरताय? त्यावर प्रश्न विचारायला गेल्यावर देशद्रोही ठरवले जाते. त्यामुळे तुम्ही आता कोणाकोणाला देशद्रोही ठरवणार?

आम्ही रामभक्त आहोत. राम तुमच्या बापाचा आहे का? राम आमच्या सगळ्यांचा आहे. तुम्ही रामाच्या आडून पापं करताय. आम्ही रामरक्षक आहोत. आमच्या रक्षणासाठी आम्ही ज्या रामाचा धावा करतो, आज त्याच्या रक्षणाची वेळ आमच्यावर आलीय. यालाच तर कलियुग म्हणतात.

जेव्हा शिवसेना हा पक्ष फोडला, पक्ष चोरला तेव्हापासूनशिवसेनेचं नाव आणि निशाणी एका गद्दाराला दिली. खरं तर निशाणी ही गोठवली पाहिजे आणि नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाच्या प्रमुखाला नाही. ते मानायला मी तयार नाही. हे ऑन रेकॉर्ड बोलतोय. कारण शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. ते बदलण्याचा अधिकार देशात कोणालाही नाही आणि मी ते मान्यच करणार नाही. शिवसेना ही शिवसेनाच आहे. दुसरी आहे ती शहासेना आहे. त्याला तुम्ही शहासेना नाव द्या आणि कोणतंही चिन्ह द्या. तोफ द्या, अणुबॉम्ब द्या, राफेलचं विमान द्या. चालेल मला.