आवाज उठवत राहणार…पंतप्रधानांनी माफी मागायलाच हवी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि शिक्षण व्यवस्थेतील विध्वंसकतेचे प्रतीक होते. त्यांना जावेच लागणार होते. पण अजूनही विद्यार्थ्यांच्या दोन मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ले करणाऱया अधिकाऱयांवर कारवाई व्हायला हवी आणि सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागायला हवी. तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. संसदेत आवाज उठवत राहणार,’ असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिला.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दहा जनपथ येथे ते पत्रकारांशी बोलत होते. राहुल यांनी देशातील तरुणाईचे अभिनंदन केले. ‘प्रधान यांचा राजीनामा हा देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईचा विजय आहे. भाजप आणि आरएसएसला हा देश आपली जहांगिरी असल्याप्रमाणे चालवता येणार नाही हा या आंदोलनाचा संदेश आहे. यापुढेही मनमानी करण्याचा प्रयत्न झाल्यास आताच्या दहापट उद्रेक पाहायला मिळेल, असे राहुल म्हणाले. ‘आरएसएसने वाळवीप्रमाणे आपली शिक्षण व्यवस्था पोखरून टाकली आहे. त्यांच्या पाशातून ही व्यवस्था मुक्त झाली पाहिजे,’ असे राहुल गांधी म्हणाले.

घाबरू नका… ठामपणे उभे राहा!

‘तरुणांचा विजय हा सरकारकडून दडपले गेलेले देशातील गोरगरीब आणि शेतकऱयांसाठी मोठा संदेश आहे. त्यांनी आता न घाबरता उभे राहायला हवे. अन्यायाविरोधात उभे राहण्यातच शहाणपणा आहे,’ असे सांगतानाच, ‘चला, सर्व मिळून ही राजवट घालवूया,’ असे आवाहन राहुल यांनी केले.

तरुणांनी सरकारचा अहंकार मोडून काढला – केजरीवाल

सरकार कुणाचंही ऐकत नव्हतं. देशातील नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वासच उडाला होता, पण ‘तरुणांनी सरकारचा अहंकार मोडून काढला,’ असे आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले.

ही लढाई आता ईव्हीएमपर्यंत जाईल – अखिलेश

शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांची लढाई जिंकून तरुणांनी सुरुवात केली. ही लढाई आता संविधान हातात घेऊन ईव्हीएम आणि निवडणूक सुधारणांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास सपा नेते अखिलेश यादव यांनी व्यक्त केला.