
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. यामुळे फडणवीस केंद्रात मंत्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न केल्यानंतर मुख्यमंत्री सोलापूरहून थेट दिल्लीकडे रवाना झाले. केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना अचानक दिल्लीत का बोलावून घेतले, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये फडणवीस यांच्यावर राष्ट्रीय पातळीवर नवी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
प्रधान यांचे वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य – देवेंद्र फडणवीस
धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणांची अंमलबजावणी केली. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ लागू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. व्यापक जनहिताप्रती आपली वचनबद्धता दर्शवत त्यांनी आज राजीनामा सादर केला. प्रधान यांनी वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले, हेच एका खऱ्या भाजप कार्यकर्त्याचे वैशिष्टय़ आहे. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

























































