
महिनाभरापासून सुरू असलेल्या धो धो पावसामुळे मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरातील डोंगर आज दुपारी अचानक खचला. त्यामुळे या भागात बांधण्यात आलेली संरक्षक भिंत रस्त्यावर कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी डोंगर खचल्यामुळे नऊ घरे धोकादायक बनली आहेत. या घरांजवळ जमिनीचा काही भाग खचलेला असल्याने येथे वास्तव्य करणाऱ्या नऊ कुटुंबांचे अन्यत्र स्थलांतर करण्याच्या सूचना ठाणे महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत.
मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात डोंगर खचला असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दुपारी सवाएकच्या सुमारास मिळाली. त्यानुसार पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक माने, मुंब्रा प्रभाग समितीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. भिंतीचा रस्त्यावर पडलेला ढिगारा तातडीने हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
मुंब्र्या तील या डोंगरावर मोठ्या प्रमाणात चाळी बांधण्यात आल्या आहेत. डोंगर खचल्याचा प्रकार आज उघडकीस आल्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
डोंगरावर ज्या ठिकाणी जमीन खचली त्या भागात महापालिका प्रशासनाने धोकापट्टी लावून नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. डोंगर खचल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर शासकीय यंत्रणेची एकच पळापळ उडाली.
डोंगर खचल्यामुळे दत्त मंदिर परिसरातील नऊ घरांना धोका निर्माण झाला आहे. या घरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना बांधकाम विभागाने तात्पुरते दुसरीकडे राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

























































