
बहुमत आहे म्हणून जास्त माजू नका. हिटरसारखे वागाल, तर हिटरच्याच मार्गाने सत्ताधाऱ्यांना जावे लागेल. मुसोलिनीसारखे वागाल, तर त्याच्याच मार्गाने तुमचा अंत होईल. गद्दाफीसारखे वागाल, तर त्याच्याप्रमाणेच अंत होईल. हा या आंदोलनाचा सगळ्यात मोठा बोध आहे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. रविवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. तसेच जर हा बोध आमच्या राज्यकर्त्यांनी घेतला असेल, तर त्याचे प्रतिबिंब सोमवारी अधिवेशनात दिसेल, असेही ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, मोदी सरकारला झुकावे लागले. खरे म्हणजे सरकारने जनतेसमोर कायम विनम्रता भाव ठेवायला हवा. जिथे जिथे भाजप सरकार आहेत, मग देशात असो किंवा राज्यात तिथे तिथे विनम्रता, संयम हे शब्द त्यांनी त्यांच्या शब्दकोषातून नष्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे नाही… नाही… नाही… शक्य नाही करत त्यांना युवाशक्तीच्या सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. याचा आनंद सगळ्यांना होणार आहे.
मोदींसारखे लोक जेव्हा झुकवले जातात तेव्हा हिटरलला झुकवल्याचा आनंद मिळतो. तरीही संयम राखला पाहिजे. कारण 20 ते 21 मुलं या लढ्यात बळी पडलेले आहेत. आत्महत्या केलेल्या आहेत. लाठ्या खाल्लेल्या आहेत. डोकी फुटलेली आहेत. पेलेट गनच्या गोळ्या झेललेल्या आहेत. काही लोकांची दृष्टी गेलेली आहे. आनंद साजरा करताना हे विसरता येणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
आज छत्रपती शिवाजी महाराज पार्काजवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. खरे म्हणजे हा एक मोर्चा निघणार होता, पण आता मोर्चाचे प्रयोजन राहिले नाही. जंतरमंतरवर सुद्धा आंदोलन तसे संपलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा फडकणार नाही, हे सगळ्यात आधी आम्ही स्पष्ट केले. तिथे सगळ्यांनी यावे. तिथे व्यासपीठ नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही दोनच भाषणं तिथे होतील, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
धर्मेंद्र प्रधान यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अशी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे जे बोलले ते अत्यंत योग्य आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या हलगर्दीपणामुळे पेपर फुटले, 20 जणांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. जेव्हा एका आत्महत्येस कुणी जबाबदार असतो तेव्हा त्याच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. त्याच्यामुळे जर हे कायद्याचे राज्य असेल तर देशाच्या पंतप्रधानांपासून ते या शिक्षणमंत्र्यांपर्यंत सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला काहीच हरकत नाही. आता नवीन शिक्षणमंत्री आलेले आहेत. तो म्हणजे कालचा गोंधळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ आली, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
आयटी सेलला ताळे लावावे लागले
ते पुढे म्हणाले की, लोकांना एक नवीन चेहरा हवा होता. तरुणांची भाषा, तरुणांचे विचार हे या पिढीपेक्षा वेगळे आहेत. जंतरमंतरवर आणि आंदोलनात तरुणांनी काय क्रिएटिव्हिटी केली हे आपण पाहिले. शेवटी भाजपच्या आयटी सेललाही ताळे लावावे लागले. ही नवीन युवा पिढी आहे. जंतरमंतरवर सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या. लाल बावटा, नीळा बावटा आणि इतर सगळेच एकत्र आले. विरोधी पक्ष सुद्धा आपले सगळे बावटे दूर ठेऊन ज्या दिवशी मनाने आणि भूमिकेने एकत्र येतील तेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक एक दिवससुद्धा सत्तेवर राहणार नाहीत. जंतरमंतरवर भव्य आंदोलन झाले आणि जगाने त्याची दखल घेतली. ईव्हीएम घोटाळा, मतचोरी, आमदार-खासदारांची फोडाफोडी, पक्ष फोडणे, संविधानावर हल्ला या कारणासाठी एकत्र येऊन लढा दिला तर सत्ताधाऱ्यांना देश सोडून पळून जावे लागेल, असेही संजय राऊत म्हणाले.

























































