हिंदुस्थानी तरुणाचा अमेरिकेत अपघात, मेंदूशी संबंधित दुर्मिळ समस्येमुळे उपचारादरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणातील तरुणाचा अमेरिकेत अपघातामुळे मृत्यू झाला. नित्यानंद रेड्डी गन्नू असे मयत तरुणाचे नाव आहे. रेड्डीला रस्ते अपघातात गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान मेंदूशी संबंधित दुर्मिळ गुंतागुंत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, रेड्डी हा तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. त्याने इंडियाना टेक (Indiana Tech) मधून ‘इन्फॉर्मेशन सिस्टिम्स’मध्ये पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री) पूर्ण केली होती. 18 जुलै रोजी अमेरिकेतील मिशिगनमधील ॲन आर्बर येथे एका अपघातात रेड्डी गंभीर जखमी झाला होता.

अपघातात रेड्डीला अनेक गंभीर दुखापती झाल्या. शस्त्रेक्रियेनंतर रेड्डीच्या प्रकृतीत सुधारणा होईल अशी आशा होती. परंतु त्याला सेरेब्रल फॅट एम्बोलिझम (cerebral fat embolism) नावाची दुर्मिळ आणि जीवघेणी स्थिती उद्भवली. यामुळे 22 जुलै रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रेड्डीचा मृतदेह हिंदुस्थानात आणण्यासाठी आवश्यक निधी गोळा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी ‘गो-फंड-मी’ (GoFundMe) मोहीम सुरू केली आहे.