युक्रेनच्या ओडेसा बंदरात व्यापारी जहाजावर हल्ला; दोन हिंदुस्थानी कर्मचारी बेपत्ता, शोधकार्य सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युक्रेनच्या ओडेसा बंदरात चार हिंदुस्थानी कर्मचारी असलेल्या एका व्यापारी जहाजावर हल्ला झाला. या हल्ल्यात दोन हिंदुस्थानी नागरिक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर काळा समुद्र क्षेत्रात खलाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, ओडेसा बंदरात 25 जुलै रोजी ‘एमव्ही ॲग्न रॅग्नार’ (MV AGN Ragnar) या जहाजावर हल्ला झाला. या जहाजावर चार हिंदुस्थानी कर्मचारी होते. त्यापैकी दोघे बेपत्ता असून दोघे सुखरुप आहेत, असे कीव्हमधील हिंदुस्थानी दूतावासाने सांगितले. बेपत्ता कर्मचाऱ्यांची अद्याप ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत आणि घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे हिंदुस्थानी दूतावासाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्या शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे, असे दूतावासाने सांगितले.

याआधी 19 जुलै रोजी युक्रेनियन बंदरातून बाहेर पडत असताना ‘एमव्ही गोल्डन लिओ’ (MV Golden Leo) या व्यापारी जहाजावर हल्ला झाला होता. यात चार हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेला आठवडा पूर्ण होत नाही तोच ही घटना घडली आहे.