
युक्रेनच्या काळ्या समुद्रात हिंदुस्थानी कर्मचारी असलेल्या व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांवर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अत्यंत आक्रमक आणि तीव्र भूमिका घेतली आहे. या हल्ल्यांचा कडक शब्दांत निषेध नोंदवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनचे राजदूत डॉ. ओलेक्झांडर पोलिशचुक यांना बोलावून घेतले आहे.
शनिवारी युक्रेनमधील ओडेसा बंदरात ‘एमव्ही एजीएन रॅग्नर’ या व्यापारी जहाजावर हल्ला झाला होता. या जहाजावर चार हिंदुस्थानी कर्मचारी उपस्थित होते. कीव येथील हिंदुस्थानी दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार ही घटना शनिवारी घडली. 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून काळ्या समुद्रावरील ओडेसा या मुख्य बंदराला वारंवार लक्ष्य केले जात आहे. ओडेसा बंदरातील या घटनेच्या अवघ्या काही दिवसांआधी ‘एमव्ही गोल्डन लिओ’ या अन्य एका व्यापारी जहाजावर रशियन हल्ला झाला होता. या दुर्दैवी हल्ल्यात चार हिंदुस्थानी खलाशांचा मृत्यू झाला होता. नागरी जहाजे आणि निष्पाप हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या या हल्ल्यांवर हिंदुस्थानने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
एमव्ही गोल्डन लिओ जहाजावरील प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, हिंदुस्थानने रशियन प्रशासकीय यंत्रणेलाही तात्काळ पाचारण केले होते. रशियाचे मुख्य राजदूत नवी दिल्लीत उपलब्ध नसल्यामुळे, हिंदुस्थानने रशियाचे प्रभारी राजदूत व्लादिमीर लादानोव्ह यांना मंगळवारी सकाळी परराष्ट्र मंत्रालयात बोलावून आपला निषेध नोंदवला. या राजनैतिक कारवाईचे टीव्ही पथकांनी चित्रीकरण केले असून या घडामोडीची सार्वजनिक पातळीवर नोंद घेण्यात आली आहे.
























































