दुबईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात धूर, राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुबईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे गुजरातच्या राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात धूर दिसल्याने आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे IGO1452 हे विमान दुबईहून मुंबईला चालले होते. विमानात एकूण 194 प्रवासी होते. प्रवासादरम्यान विमानाच्या कार्गो होल्ड भागात धूर आढळून आला. यानंतर विमान राजकोट विमानतळावर वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली.

आपत्कालीन लँडिंगची माहिती मिळताच, राजकोट विमानतळाच्या धावपट्टीवर आपत्कालीन सुरक्षा प्रोटोकॉल सक्रिय करण्यात आले. तसेच, राजकोट अग्निशमन विभागाची वाहने आणि पाण्याचे टँकर विमानतळाच्या धावपट्टीवर तैनात करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह एक पथक विमानतळावर दाखल झाले. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.