
सरकारने प्रधानांचा राजीनामा घेऊन पंतप्रधानांना वाचवले, असा हल्लाबोल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी लोकसभेत बोलताना केंद्र सरकारवर केला आहे. लोकसभेत पेपरफुटीवर आणलेल्या दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना अखिलेश यादव यांनी शिक्षण व्यवस्था, राम मंदिरातील दान चोरी, एनटीए आणि झुरळ आंदोलन यांसारख्या विविध मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
यावेळी बोलताना अखिलेश यादव यांनी पेपरफुटी रोखण्याच्या सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की,”जे लोक राम मंदिरातील दानाची चोरी रोखू शकले नाहीत, ते पेपरफुटी कशी रोखणार?” त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, सरकारने प्रधानांचा राजीनामा घेऊन पंतप्रधानांना वाचवले आहे आणि कदाचित म्हणूनच भाजपचे खासदार खुश होऊन धर्मेंद्र प्रधानांचे स्वागत करत होते.
सरकारची शिक्षण सुधारण्याची कोणतीही इच्छा नाही, असा आरोप करत अखिलेश म्हणाले की सरकारने १ लाखांहून अधिक प्राथमिक शाळा बंद केल्या आहेत. दलित आणि मागासवर्गीयांच्या मुलांनी शिकावे असे या सरकारला वाटत नाही. एकरंगी लोक शिक्षण व्यवस्था खराब करत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये (NTA) झालेल्या कारवाईवर बोलताना त्यांनी सरकारला विचारले की, एनटीएमधून ज्यांना हटवण्यात आले ते लोक कोण होते? आणि मुळात त्यांना एनटीए मध्ये कोणी व कसे सामावून घेतले होते?


























































