
हिंदुस्थानचा माजी U-19 विश्वचषक विजेता खेळाडू मनजोत कालराचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. लंका प्रीमियर लीग (LPL) 2026 मधील कथित मॅच-फिक्सिंग प्रकरणाशी संबंधित मनजोत कालरा आणि अन्य एक हिंदुस्थानी नागरिक युवराज पुष्पा यांना कोलंबो न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव दोघांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, कोलंबोचे मुख्य दंडाधिकारी असंगा एस. बोदरागामा यांनी दोघांचा जामीन अर्ज फेटालून लावला आहे.
LPL 2026 मधील सामन्यांमध्ये फेरफार करण्यासाठी खेळाडूंना प्रलोभन दाखवण्याच्या प्रयत्नांमधून मॅच फिक्सिंगचा प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला श्रीलंकेचे आंतरराष्ट्रीय खेळाडू भानुक राजपक्षे, अविष्का फर्नांडो आणि दुनिथ वेलागे यांनी याविरोधात तक्रार नोंदवली होती. मात्र, सोमवारी, 27 जुलै 2026 झालेल्या सुनावणीदरम्यान आणखी दोन श्रीलंकन क्रिकेटपटू या तक्रारीत सामील झाल्याने, या प्रकरणात सहभागी असलेल्या खेळाडूंची एकूण संख्या आता पाचवर पोहोचली आहे. दरम्यान, अन्वेषकांनी या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ आणि व्हिडिओ पुराव्यांचा दावा केला असून कालराच्या वकिलांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर, श्रीलंका पोलिसांच्या क्रीडा गुन्हे तपास पथकाचा तपास सुरू असल्याचे सांगत न्यायालयाने त्यांचा 31 जुलैपर्यंतचा रिमांड कायम ठेवला आहे.



























































