अमित शहा जबाव दो… विरोधकांनी सरकारला घेरले; प्रचंड गदारोळात पेपरफुटी विरोधी सुधारणा विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेत पेपरफुटी विरोधी सुधारणा विधेयकावरील चर्चेतदरम्यान प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर आणि सत्ताधारी भाजपवर तीव्र हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर स्पष्टीकरण देताना केंद्रीय मंत्र्यांच्या तोडाला फेस आला. यावेळी विरोधकांनी अमित शहांविरोधात जोरदार घोषणा दिल्या. अखेर प्रचंड गदारोळात आवाजी मतदानाने पेपरफुटी विरोधी सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले.

पेपरफुटी विरोधी सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर गंभीर आरोप केले. दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या आरोपवर आक्षेप घेत सत्ताधारी खासदारांनी गदारोळ केला. यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. यामुळे राहुल गांधी यांना भाषण पूर्ण करता आले नाही. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी पुन्हा गदारोळ केला.

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी विरोधी पक्षांच्या खासदारांनी जबाव दो… जवाब दो… अमित शहा जबाव दो, सदन मे आओ… सदन मे आओ… अमित शहा सदमे आओ…, बोलने दो… बोलने दो… एलओपी को बोलने दो… वुई वॉन्ट जस्टिस… छात्रो को न्याय दो… न्याय दो.. न्याय दो…, लाठीचार्ज किसने करवाया… अमित शहा… अमित शहा… अशा जोरदार घोषणा देत सरकारला घेरले. या सर्व गदारोळात राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना केंद्रीय मंत्र्यांच्या तोंडाला फेस आला. अखेर जितेंद्र सिंह यांना आपलं भाषण आवरतं घ्यावं लागलं. विरोधी पक्षांच्या खासदारांच्या घोषणाबाजीतच पेपरफुटी विरोधी सुधारणा विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात आले. हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. गदारोळ सुरूच राहिल्याने अखेर सभागृहाचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.