
लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याच्या लढय़ाला जनआंदोलनाचे स्वरूप देतानाच सांस्कृतिक राष्ट्रवादाची पायाभरणी केली. सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी देशाला राष्ट्रवादाची नवी दिशा दिली. आजचा हिंदुस्थान त्याच सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गावर वाटचाल करत असून, त्या विचाराला आता कोणीही मागे खेचू शकणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केले.
लोकमान्य टिळक मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, टिळक स्मारक ट्रस्टचे डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणीती टिळक आदी उपस्थित होते.
अमित शहा म्हणाले, टिळकांनी स्वराज्याच्या आंदोलनात जनतेला सहभागी करून घेत स्वातंत्र्यलढय़ाला नवे स्वरूप दिले. देशाला कोणत्या मार्गाने पुढे जायचे, याची दिशा त्यांनी दाखवून दिली. त्यांची दूरदृष्टी आजही देशाला मार्गदर्शक ठरत आहे.
शहा पुढे म्हणाले, प्रत्येक तरुणाने टिळकांच्या दृष्टिकोनातून गीतारहस्य समजून घेतले पाहिजे. गीतारहस्य वाचा, आयुष्यात कधीच चूक होणार नाही, याची मी गॅरंटी देतो.
























































