
‘चायवालाज’ नावाने फेमस असलेल्या रोहित शर्मा या तरुण उद्योजकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सैंथल मोड येथील राहत्या घरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आले नसून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
तरुण उद्योजक रोहित शर्मा याने जयपूरमधून ‘चायवालाज’ नावाने चहाचा ब्रँड सुरू करून व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. आपल्या अनोख्या कल्पनेतून सुरू केलेल्या स्टार्टअपचे अनेक आउटलेट्स असून ते तरुणांमध्ये लोकप्रिय ठरले होते. व्यवसायासोबतच त्याने राजकीय क्षेत्रातही पाऊल ठेवले होते. दौसा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली होती. मात्र नंतर अचानक माघार घेतली होती.
पोलिसांचा तपास सुरू
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रोहितचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट किंवा पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे रोहितने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या आत्महत्येचा उलगडा करण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
























































