राज्यभर पावसाचे धुमशान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उशिराने दाखल झालेल्या पावसाने संपूर्ण जुलै महिन्यात दमदार हजेरी लावली. जुलैच्या अखेरच्या तीन दिवसांत कोकणापासून मराठवाडा आणि विदर्भापर्यंत सर्वच भागांना झोडपले. राज्यभरातील १२४ भागांना अतिवृष्टीचा तडाखा बसल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. धरण क्षेत्रांतही मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा धो-धो पाऊस बरसणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग

राज्यातील अनेक धरणे तुडुंब भरली आहेत. धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हतनूर धरणातून १ लाख ८१ हजार ८०२ क्युसेक, प्रकाशा बंधाऱ्यातून ३ लाख ५७ हजार ४१७ क्युसेक, सारंगखेडा बंधाऱ्यातून ३ लाख ४ हजार ६८ क्युसेक, अलमट्टी धरणातून १ लाख १० हजार ६ क्युसेक आणि राजापूर बंधाऱ्यातून ८४ हजार ८३ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

आणखी तीन दिवस धो-धो कोसळणार

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्याअनुषंगाने हवामान खात्याने नव्याने अलर्ट जारी करत नागरिकांना सावध केले आहे. ३ ते ५ ऑगस्टदरम्यान राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी रविवारी वर्तवला. हवामान खात्याने ३ ऑगस्ट रोजी ८ जिल्ह्यांना आणि घाटमाथ्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे.