
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राजस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला बॉक्सर म्हणून सुवर्णपदक जिंकणाऱ्या अरुंधती चौधरीच्या गळ्यात सुवर्णपदक चमकतेय, पण त्या पदकाची दखल घेण्यासाठी राज्य सरकारकडे जणू वेळच नाही. जग जिंकून परतलेल्या या सुवर्णकन्येला अजूनही राज्य सरकारकडून साधा अभिनंदनाचा संदेशही मिळालेला नसल्याची खंत तिने व्यक्त केली. तिच्या या वक्तव्याने राजस्थानमधील क्रीडा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
महिलांच्या ७० किलो गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या शॅटेले रीडचा ५-० अशा एकतर्फी फरकाने पराभव करत अरुंधतीने सुवर्णपदक पटकावले. हा विजय केवळ तिचा नव्हता, तर राजस्थानच्या क्रीडा इतिहासातील सुवर्णपान ठरला. २३ वर्षीय अरुंधती म्हणाली, राष्ट्रकुल स्पर्धेत राजस्थानचे प्रतिनिधित्व करणारी मी पहिली महिला बॉक्सर असल्याचे मला स्पर्धेत आल्यानंतर समजले.
माझ्यासाठी ही केवळ स्पर्धा नव्हती, तर इतिहास घडवण्याची संधी होती. दबाव नव्हता, पण राज्यासाठी काहीतरी मोठं करून दाखवण्याची जिद्द होती. मी जे स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण केलं.



























































