वारंवार होणाऱ्या ॲसिडिटीकडे दुर्लक्ष करताय? या चुकांमुळे वाढू शकतो त्रास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकांना वारंवार ॲसिडिटीची समस्या भेडसावते. यामध्ये छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, घशात जळजळ होणे किंवा पोटात जडपणा जाणवणे यांसारखे त्रास होऊ शकतात. अनेकदा लोक या समस्येला सामान्य समजून दुर्लक्ष करतात. पण हा त्रास वारंवार होत असेल तर त्यामागे चुकीचे खाणे-पिणे आणि जीवनशैली हे मोठे कारण असू शकते. अशा वेळी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून त्रास वाढण्यापूर्वी ॲसिडिटीवर नियंत्रण मिळवता येईल.

काही पदार्थ असे असतात जे ॲसिडिटीची समस्या वाढवू शकतात. मात्र, योग्य आहार आणि खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयींमुळे या समस्येतून मोठा दिलासा मिळू शकतो. ॲसिडिटी दीर्घकाळ राहिल्यास इतर आरोग्य समस्या होण्याची शक्यता वाढते. जाणून घेऊया ॲसिडिटी वाढवणारे पदार्थ कोणते आहेत? या त्रासात काय खाणे योग्य मानले जाते आणि कोणत्या सवयी टाळल्या पाहिजेत…

ॲसिडिटी वाढवणारे पदार्थ कोणते आहेत?

  • काही पदार्थ ॲसिडिटीची समस्या वाढवू शकतात, तरीही प्रत्येक व्यक्तीवर याचा परिणाम वेगळा असू शकतो.
  • तळलेले व जास्त चरबीयुक्त पदार्थ टाळले पाहिजे हे पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे ॲसिडिटी वाढू शकते.
  • मसालेदार जेवण, टोमॅटो, संत्री आणि लिंबासारखी आंबट फळे, चॉकलेट, पुदिना, कॉफी, चहा, कॅफिन असलेले ड्रिंक्स आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स (सोडा/कोल्ड ड्रिंक्स) यांसारखे पदार्थांमुळे ॲसिडिटीचा त्रास होतो.

ॲसिडिटी टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

  • ॲसिडिटीचा त्रास होत असल्यास हलका आणि सहज पचणारा आहार निवडा.
  • ॲसिडिटी झाल्यास ओट्स, केळी, हिरव्या पालेभाज्या, धान्ये, दही, डाळी आणि इतर फायबरयुक्त पदार्थ हे चांगले पर्याय ठरू शकतात.
  • थोड्या-थोड्या प्रमाणात खाणे आणि पुरेसे पाणी पिणे हे देखील फायदेशीर ठरते.
  • तुम्हाला जर एखाद्या विशिष्ट पदार्थाने ॲसिडिटी वाढत असेल तर, तो खाणे टाळा.

ॲसिडिटी वाढल्यावर कोणत्या सवयी टाळाव्यात?

  • एकाच वेळी खूप जास्त खाणे टाळा आणि जेवल्यानंतर लगेच झोपू नका. त्यामुळे ॲसिडिटी वाढण्याचा धोका जास्त असतो.
  • रात्रीचे जेवण झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी करावे
  • धूम्रपान आणि दारूपासून दूर राहा. कारण यामुळे ॲसिडिटी वाढू शकते.
  • खूप घट्ट कपडे घातल्यामुळेही अनेकांना त्रास होऊ शकतो.
  • ॲसिडिटी वारंवार होत असेल किंवा दीर्घकाळ राहत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.