बाय बाय ग्लासगो… वेलकम अहमदाबाद! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची मशाल हिंदुस्थानच्या हाती सोपवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्कॉटलंडमधील ग्लासगोने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला रविवारी रंगतदार आणि भावपूर्ण निरोप दिला. मात्र समारोप सोहळ्यातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण ठरला तो 2030च्या शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची धुरा अधिकृतपणे हिंदुस्थानातील अहमदाबादकडे सोपविण्याचा. राष्ट्रकुल स्पर्धेचा झेंडा ऑलिम्पिक आणि विश्वविजेता नीरज चोप्रा, हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द होताच, क्रीडा जगताच्या नजरा आता हिंदुस्थानकडे वळल्या आहेत.

स्कॉटलंडच्या परंपरेचा अनोखा आविष्कार

त्याआधी स्कॉटलंडच्या संगीत, संस्कृती आणि परंपरेचा अनोखा आविष्कार समारोप सोहळ्यात पाहायला मिळाला. स्कॉटिश कवयित्री जॅकी के. यांनी ‘ग्लासगो हे जगातील प्रत्येक नागरिकाचे स्वागत करणारे शहर आहे’ या भावस्पर्शी संदेशातून यजमान शहराच्या आदरातिथ्याची ओळख करून दिली. ऑस्ट्रेलियन गायिका डेल्टा गुड्रेम, स्कॉटिश कलाकार पॅमी बार्न्स, प्रायमल स्क्रीम, एलेफंट सेशन्स आणि इतर कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाने समारोप सोहळ्याला रंगत आणली. दरम्यान, स्कॉटलंडच्या पॅरा खेळाडू मेलानी वूड्स हिला उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठsचा ‘डेव्हिड डिक्सन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

शताब्दी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी हिंदुस्थान आतूर

ग्लासगोने 11 दिवसांच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करत आदरातिथ्य, मैत्री आणि एकतेचा संदेश दिला. आता 2030मध्ये शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातून हिंदुस्थानला जगासमोर आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी आतूर झाला आहे. 1930मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला 2030मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. हिंदुस्थान दुसऱयांदा या स्पर्धेचे यजमान पद भूषवणार असून 2010नंतर पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे.

हिंदुस्थानच्या सांस्कृतिकचा दिमाखदार सोहळा

‘वसुधैव कुटुंबकम् – द वर्ल्ड इज वन फॅमिली’ या संकल्पनेवर आधारित हिंदुस्थानी सांस्कृतिक सादरीकरणाने ग्लासगोच्या मंचावर हिंदुस्थानची सांस्कृतिक ताकद आणि परंपरेचा दिमाखदार सोहळा जगासमोर उभा केला. अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लरच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला सलाम करण्यात आला. शंकर महादेवन यांच्या संगीताला शियामक डावर यांच्या नृत्यदिग्दर्शनाची जोड लाभली, तर शिवम आणि सिद्धार्थ महादेवन तसेच गायिका भूमी त्रिवेदी यांच्या दमदार सादरीकरणाने हिंदुस्थानी रंगमंच अक्षरशः उजळून निघाला.