
बुद्धिबळ विश्वाचे लक्ष वेधून घेणारी फिडे विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा येत्या 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे रंगणार आहे. या प्रतिष्ठsच्या लढतीत विद्यमान जगज्जेता दोम्माराजू गुकेश आपल्या किताबाच्या बचावासाठी उतरणार आहे, तर त्याला उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोवचे तगडे आव्हान असेल. विशेष म्हणजे, सामना सुरू होताना दोन्ही ग्रॅण्डमास्टर्सचे वय अवघे 20 वर्षे असेल. त्यामुळे फिडे वर्ल्ड कप बुद्धिबळाच्या इतिहासातील ही सर्वात युवा विश्वविजेतेपदाची लढत ठरणार आहे.
फिडेचे अंतरिम अध्यक्ष विश्वनाथन आनंद यांनी जिनेव्हाची यजमान शहर म्हणून घोषणा केली. यजमानपदासाठी हिंदुस्थान, अमेरिका आणि सायप्रस यांच्यासह अनेक देशांनी उत्सुकता दाखवली होती. सर्व प्रस्तावांचा विचार करून बुद्धिबळाची समृद्ध परंपरा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि विविध संस्कृतींना जोडणारी ओळख लक्षात घेऊन जिनेव्हाची निवड करण्यात आल्याचे आनंद यांनी सांगितले. जगभरातील बुद्धिबळप्रेमींना अविस्मरणीय विश्वविजेतेपदाची लढत पाहण्याची संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गुकेशने डिसेंबर 2024 मध्ये सिंगापूर येथे चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून इतिहास रचला होता. अवघ्या 18व्या वर्षी विश्वविजेता बनण्याचा मान मिळवत त्याने गॅरी कास्पारोव्हचा विक्रम मोडला होता. आता प्रथमच त्याच्यासमोर विश्वविजेतेपद टिकवण्याचे मोठे आव्हान उभे आहे.दुसरीकडे, उझबेकिस्तानचा युवा ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने यंदा सायप्रसमध्ये झालेली फिडे पँडिडेट्स स्पर्धा एक फेरी बाकी असतानाच जिंकून विश्वविजेतेपदाच्या लढतीचे तिकीट मिळवले. यापूर्वी त्याने 2025 फिडे विश्वचषकही जिंकला होता. त्यामुळे ही लढत दोन युवा सुपरस्टार्समधील बुद्धी, संयम आणि मानसिक ताकदीची खरी कसोटी ठरणार आहे. विश्वविजेतेपदाचा सामना 14 क्लासिकल डावांचा असेल. 7.5 गुण प्रथम मिळवणारा खेळाडू विश्वविजेता ठरेल. 14 डावांनंतर बरोबरी झाल्यास विजेता टायब्रेकद्वारे निश्चित केला जाईल.


























































