सहकार टॅक्सीत चालक भागीदार; संयुक्त बैठकीला 18 युनियनचे प्रतिनिधी उपस्थित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

चालक, मालक, युनियन आणि प्रवासी या सर्वांना विश्वासात घेऊन नमो सहकार टॅक्सीची वाटचाल राहील. या उपक्रमातील प्रत्येक चालक आणि मालक हा या उपक्रमात भागीदार असेल, अशी ग्वाही मुंबई बँकेत पार पडलेल्या चालक, मालक, टॅक्सी युनियन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आली. या उपक्रमात हजारो मराठी चालकांना तसेच महिलांनाही हक्काचा रोजगार मिळणार आहे. बैठकीत अनेक सूचना करण्यात आल्या तसेच या योजनेत रिक्षाचाही समावेश करावा, अशी मागणी झाली.

कष्टाने टॅक्सी चालवणाऱ्या चालकांचे सततचे आर्थिक शोषण आणि प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी ही टॅक्सी सेवा आहे. चालकांची दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी, प्रशिक्षण, विमा, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी मार्गदर्शन, नवीन वाहनासाठी कर्ज, व्याज परतावा योजना, अशा प्रकारची आखणी करण्यात आली आहे. ज्या महिलांना या सेवेत यायचे असेल, त्यांच्यासाठीदेखील विशेष योजना राबवल्या जाणार आहेत, असे या वेळी या टॅक्सी सेवेचे प्रमुख मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.

या मेळाव्याला मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, नमो सहकार टॅक्सीचे मुख्य व्यवस्थापक सुदेश रोझेकर, संदीप सुर्वे, विठ्ठलराव भोसले, संदीप देशपांडे, शशांक राव, प्रशांत सावर्डेकर, संजय नाईक,  सुनील बोरकर, रिझवान शेख, महेश कदम, अविनाश खोत, अण्णा देसाई, दयानंद गायकवाड, दिलीप आमले, आशा मामेडी, शामराव खानविलकर, दीपक पाटील, भरत ठोंबरे, मनोज वाघमारे असे सर्वपक्षीय युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चालकांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक

कमिशन, महिलांना संधी, वाहन कर्ज, रेट, सार्जिंंग, प्रशिक्षण आणि कल्याणकारी योजनांवर या वेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान, चालकांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे या वेळी सांगण्यात आले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही सहकार्याबाबत आश्वस्त केले.