झाडे तोडणाऱ्या दोन हाऊसिंग सोसायट्यांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-bmc-files-fir-against-two-housing-societies-for-illegal-tree-cutting-poisoning

झाडांचे नुकसान आणि मंजुरीपेक्षा जास्त प्रमाणात छाटणी केल्याप्रकरणी महापालिकेने दोन हाऊसिंग सोसायट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळील शीतल तपोवन हाऊसिंग सोसायटी संकुलाबाहेरील झाडांना इजा पोहोचवल्याप्रकरणी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि विकासकाविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुह्याची नोंद झाली आहे. तसेच, घाटकोपर पश्चिम येथील कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटीच्या आवारातील वृक्षांची नियमबाह्य छाटणी केल्याचे आढळून आल्याने या गृहनिर्माण संस्थेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालाडच्या डीजीएम शीतल तपोवन हाऊसिंग सोसायटीसमोरील दोन झाडांना विषारी इंजेक्शन देऊन ती सुकविण्यात आल्याची ऑनलाइन तक्रार पालिकेच्या पी उत्तर विभागाकडे आली होती. घाटकोपर पश्चिम येथील कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटी लिमिटेड गृहसंकुलात 100 हून अधिक झाडांची महापालिकेने मंजूर केलेल्या परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक छाटणी केल्याची तक्रार पालिकेच्या एन विभागाकडे आली होती. या दोन्ही तक्रारींची दखल घेऊन उद्यान विभागाच्या अधिकाऱयांनी घटनास्थळांची पाहणी केली आणि कारवाईचा बडगा उगारला.

वृक्षसंवर्धन नियमांचे उल्लंघन करून झाडांचे नुकसान करणाऱया कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा विकासकाला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.