
मुंबई पोलीस दलाला हादरवून टाकणाऱ्या बनावट आयडी आणि करोडो रुपयांच्या वेतन घोटाळाप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस सहआयुक्त (प्रशासन) सुवेज हक यांनी ही कारवाई केली असून पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय आरोपींना मुंबई सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालय अधीक्षक विजया अशोक चव्हाण आणि वरिष्ठ लिपिक अमोल अरुणराव मेश्राम यांचा समावेश आहे. उत्तर प्रादेशिक विभागीय अपर पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत असताना दहा व्यक्तींचे बनावट सर्व्हिस आयडी आणि डीसीपीएस आयडी बनवून त्यांना पगार मंजूर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जवळपास दोन वर्षे हा घोटाळा सुरू होता. या काळात बनावट पोलिसांना तब्बल ६.४१ कोटी रुपये वाटण्यात आल्याचे अंतर्गत लेखा परीक्षणातून समोर आले आहे.
या प्रकरणी मागील महिन्यात समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याआधारे प्राथमिक चौकशी करून आरोपींवर शासनाची फसवणूक करणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चव्हाण व मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असून निलंबन काळात आरोपींना खासगी नोकरी वा उद्योगधंदा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.



























































