
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या भायखळा येथील राणीच्या बागेतील शासकीय निवासस्थानाच्या नूतनीकरणावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. केवळ चार महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यात 2.4 कोटी रुपये खर्च करून बंगल्याची दुरुस्ती केल्यानंतर, आता बीएमसीने पुन्हा 2.9 कोटी रुपयांच्या नवीन कामांसाठी निविदा काढली आहे. यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी बीएमसीसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. महापौर बंगल्याचा ताजमहाल करायचा आहे का? नुतनीकरण झालेलं असतानाही पुन्हा खर्च का? असा खडा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
बुधवारी माध्यमांनी महापौर बंगल्यासाठीच्या खर्चावरून माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, कुणी एवढा खर्च केला नसेत, असा खर्च सध्याच्या महापौर करत आहेत. आमदार म्हणून आम्हाला पूर्ण मतदारसंघासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो. खासदार म्हणून ज्यांच्या मतदारसंघात 6 विधानसभा असतात त्यांनाही 5 कोटी मिळतात, पण महापौरांना फक्त त्यांच्या बंगल्यासाठी साडे पाच कोटींचा निधी मिळालेला आहे. नवीन गाड्या ज्या घेत आहेत त्या देखील दीड-दोन कोटी रुपयांच्या आहेत. हा सगळा खर्च स्वत:वर कशासाठी करताय? नेमके तुम्हाला जगाला काय दाखवायचे आहे? महापौर बंगला तुम्ही पर्यटन स्थळ करताय की ताजमहाल करताय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
बेस्टचे रूट कमी होत आहेत. बस कमी होत आहेत. पगार, पेन्शन वेळेवर दिली जात नाही. मुंबईत सगळीकडे कचऱ्याचे ढिगारे वाढत चालले आहेत. रस्त्यांच्या कॉक्रिटिकरणाचाही प्रश्न आहे. या सगळ्यांसाठी आमच्याकडे पैसे नाहीत असे बीएमसी सांगते, पण महापौरांच्या बंगल्यासाठी साडे पाच कोटी उडवण्यासाठी किंवा नवीन गाड्यांसाठी बरोबर पैसे सापडतात, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
फेकनाथ मिंधे सभागृहात बोलले होते की, दोन वर्षांत मुंबईचे रस्ते चकाचक होतील. चार वर्षे झाली आता त्याला. स्वत:चे खिसे भरले, पण खड्डे अजून भरले नाहीत. हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे. मुंबईतील 16 एकर जागा भाजपच्या मित्राला दिली जात आहे. फुटबॉलचे मैदानही भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरला दिले जात आहे, अशी टीकाही आदित्य टाकरे यांनी केली. तसेच याच संदर्भात आदित्य ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्टही शेअर केली आहे.
भाजपा महापौरांच्या मर्जीखातर बीएमसी मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी करत आहे. आधीच झालेल्या नूतनीकरणाव्यतिरिक्त, मुंबईतील एका अत्यंत शांत भागात पुन्हा एकदा सुशोभीकरण आणि ध्वनिरोधक बसवले जात आहेत! याशिवाय, महापौर आणि इतर काही जणांना मुंबईच्या रस्त्यांवर त्यांच्या सध्याच्या गाडीतून प्रवास करताना सोयीस्कर वाटत नसल्यामुळे अर्थातच नवीन गाड्यांची मागणी केली गेली आहे. हे सर्व मुंबईची मोकळी मैदाने व जागा खासगी हातात सोपवत असताना घडत आहे. याच कारणासाठी भाजपला बीएमसी जिंकायची होती, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
Kharche pe Charcha!
The @mybmc is spending Mumbaikar’s money for the whims of the bjp mayor.
Apart from a renovation already, another facelift and sound barriers in a relatively quiet area in Mumbai!Apart from this, ofcourse the new car demand since apparently she and a few… pic.twitter.com/f28qFlBPDF
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 5, 2026






























































