घर सुनेचे असले तरी सासूला राहण्याचा अधिकार, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घराची मालकी सुनेच्या नावावर असली तरी त्या घरात राहण्याचा कायदेशीर अधिकार सासूला नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. केवळ मालकी आहे म्हणून सून सासूला घराबाहेर काढू शकत नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले. न्यायाधीश राकेश कैथला यांनी सुरक्षी बेदी विरुद्ध मनजीत कौर या खटल्यात सुनेची याचिका फेटाळून लावत मंडी जिल्हा न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला.

मंडी जिल्ह्यातील एका महिलेच्या मुलाचा विवाह 2013 मध्ये झाला. संपूर्ण कुटुंब एकाच घरात राहत होते. 2025 मध्ये कौटुंबिक वाद झाल्यानंतर सुनेने संबंधित घर तिच्या स्वतःच्या कमाईतून बांधल्याचा दावा केला. घरावर केवळ तिचाच अधिकार आहे, असे सांगून घर भाड्याने दिले व सासूला घराबाहेर जाण्यास सांगितले. यानंतर सासूने कोर्टात धाव घेतली. सासू-सून एकाच घरात राहत आहेत. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीला भाडेकरू ठेवून सासूला घराबाहेर काढणे कायद्याच्या विरोधात आहे, असे कोर्टाने नमूद केले.