भाजप नगरसेवक आकाश पुरोहित यांना न्यायालयाचा दणका, कोर्टातील वारंवार गैरहजेरी भोवली; जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयीन कोठडीत रवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भाजप नगरसेवक आकाश पुरोहित यांना मुंबई सत्र न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहिल्याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी आकाश पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती देण्यासही नकार दिला. न्यायालयाने सुटकेची मागणी फेटाळून लावल्याने अटकेनंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

कोविडच्या महामारीत अनेकांना नोकरी, व्यवसायपासून मुकावे लागले. पोटाची खळगी भरण्याचे वांदे असतानाच बेस्ट प्रशासनाने भरमसाट बिले ग्राहकांना पाठवली त्याविरोधात भाजपने बेस्ट विरोधात आंदोलन केले होते इतकेच नव्हे तर बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेरण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह माजी आमदार अतुल शहा, भाजप नगरसेवक आकाश राज पुरोहित, नगरसेविका शीतल गंभीर व अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यावर आज विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने भाजप नगरसेवक आकाश पुरोहित यांना 19 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.