
आंबोलीतील महादेवगड पॉइंट येथे पर्यटनासाठी आलेले डॉ. आयुब सय्यद (45, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) हे मंगळवारी सायंकाळी सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळले. दाट धुके आणि पावसामुळे मंगळवारी रात्री शोधमोहीम थांबवावी लागली. अखेर आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास सह्याद्री अॅडव्हेंचर रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला.
डॉ. आयुब 9 सहकाऱयांसोबत मंगळवारी आंबोलीत आले होते. दिवसभर पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी ते सर्वजण महादेवगड पॉइंट परिसरात होते. यावेळी आयुब हे लघुशंकेसाठी दरीच्या बाजूला उभारण्यात आलेल्या सुरक्षिततेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले. मात्र, दरीच्या कडेला अचानक पाय घसरून तोल गेल्याने ते खोल दरीत कोसळले. स्थानिक विव्रेत्याने त्यांना दरीत कोसळताना पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या सहकाऱयांना या अपघाताची कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली.





























































