कॉक्रोच जनता पार्टीकडून ‘क्या बोलती पब्लिक’ अभियानाची घोषणा, नागरिकांच्या समस्या घेणार जाणून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजित दिपके यांनी ‘क्या बोलती पब्लिक’ या देशव्यापी जनसंपर्क अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिपके म्हणाले की, या अभियानात शिक्षण सुधारणा हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. देशात शिक्षण दिवसेंदिवस महाग होत असून, अनेक कुटुंबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पहिली इयत्तेत प्रवेशासाठीच अनेक शाळांमध्ये वार्षिक शुल्क 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत आकारले जात आहे. त्याशिवाय देणगीची रक्कमही भरावी लागत असल्याचा दावा त्यांनी केला.

मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे एवढा खर्च कसा करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुरेसे उत्पन्न नसताना पालकांनी इतकी मोठी रक्कम कुठून आणायची, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेसची शुल्कही सातत्याने वाढत असून, त्यामुळे अनेक कुटुंबांना कर्ज काढावे लागत असल्याचा आरोप दिपके यांनी केला. मुलांना उच्च शिक्षण द्यायचे असेल तर पालकांवर आर्थिक ओझे पडू नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत दिपके म्हणाले की, शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत शिक्षण हा अधिकार न राहता तो नफ्याचा व्यवसाय बनत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

‘क्या बोलती पब्लिक’ अभियानाच्या माध्यमातून शिक्षणासह विविध लोकहिताच्या प्रश्नांवर नागरिकांचे मत जाणून घेऊन त्यावर व्यापक जनजागृती आणि पाठपुरावा केला जाणार असल्याचेही दिपके यांनी स्पष्ट केले.